मालाड: बोरिवलीतील प्रादेशिक परिवहन विभागाचे कनिष्ठ लिपिक मिथुन विलास आडे यांना सोमवारी चार हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. तक्रारदाराच्या खाजगी बसवर बोरिवलीतील प्रादेशिक परिवहन विभागाने 26 हजार 500 रुपयांचा दंड आकारला होता.
दंडाची रक्कम कमी व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी त्यांनी कनिष्ठ लिपीक मिथुन आडे यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडे दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करण्यात आली होती. त्यात मिथुन आडे यांनी तक्रारदाराच्या बसवरील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी करुन चार हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या पथकाने तात्काळ संबंधित विभागात सापळा लावला होता.