Bombay High Court Pudhari
मुंबई

High Court : वडिलांची काळजी घेणाऱ्या मुलीला संपूर्ण मालमत्ता देणारे ‘मृत्युपत्र’ वैध, उच्च न्यायालयाने मुलाचे दावे फेटाळले

वडिलांच्या स्वाक्षरीमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आणि ते मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा आरोप मुलाच्या वतीने करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जन्मदात्या वडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणाऱ्या मुलीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. वडिलांनी मुलीला संपूर्ण मालमत्ता देत बनवलेले मृत्युपत्र न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने पूर्णपणे वैध ठरवले. या मृत्युपत्राद्वारे वडिलांनी मुलाला मालमत्तेतून पूर्णपणे बेदखल केले होते. त्याआधारे न्यायालयाने मुलाचे दावे फेटाळून लावले.

मुंबईच्या नेपिअन सी रोड येथील रहिवासी तारापदा चॅटर्जी यांचे २४ ऑगस्ट १९९० रोजी निधन झाले. त्यांनी २१ मार्च १९८९ रोजी आपले शेवटचे मृत्युपत्र तयार केले होते. या मृत्युपत्रात त्यांनी आपली मुलगी शांता चॅटर्जी हिच्या नावावर संपूर्ण मालमत्ता केली होती आणि मुलाचे नावही घेतले नव्हते. मुलाने आणि त्याच्या कायदेशीर वारसांनी मृत्युपत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

वडिलांच्या स्वाक्षरीमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आणि ते मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा आरोप मुलाच्या वतीने करण्यात आला होता. तथापि, न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने मुलाचा दावा फेटाळून लावला. मुलगा आपल्या आई-वडिलांपासून पूर्णपणे वेगळा राहत होता.

मुलाच्या लग्‍नाची तारीख आणि ठिकाणही आई-वडिलांना माहीत नव्हते. त्यातून मुलाचे आई-वडिलांशी असलेले संबंध कमालीचे ताणलेले असल्याचे सिद्ध होते. वडिलांना पार्किन्सन आजार असल्याने मृत्युपत्रावरील त्यांची स्वाक्षरी काहीशी थरथरत आलेली होती. परंतु, त्यामुळे मृत्युपत्र खोटे ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT