पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई उच्च न्यायालयाने गँगस्टर छोटा राजन (Gangster Chhota Rajan) याला आज (दि.२३) जामीन मंजूर केला आहे. जया शेट्टी हत्या प्रकरणी मोका न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
२००१ मध्ये जया शेट्टी यांची हत्या झाली होती. या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनला मोका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. याविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना एक लाख रुपयांचा जामीन मंजूर केला आहे.
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अंडरवर्ल्ड गँगस्टर छोटा राजनला न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी 'मोका' कायद्याखाली 23 वर्षांनंतर छोटा राजनला दोषी ठरवून जन्मठेप आणि विविध गुन्ह्यांत 16 लाखांचा दंड ठोठावला होता. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर राजन टोळीच्या गुंडांनी जुलै 2001 मध्ये शेट्टी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. साक्षीदारांमध्ये जया शेट्टी यांची मुले मोहन आणि मनोहर या दोघांंचा समावेश होता. सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने छोटा राजनला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
राजनला 25 ऑक्टोबर 2015 रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर अटक करून भारतात आणले होते. महाराष्ट्रात जवळपास 70 गंभीर गुन्ह्यांत तो आरोपी आहे, तर पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे. डे यांच्या हत्येप्रकरणी छोटा राजन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात जन्मठेप भोगत आहे. महाराष्ट्र सरकारने खटला चालवण्यासाठी राजनविरोधातील सर्व 70 गुन्हे सीबीआयकडे वर्ग केले आहेत.