मुंबई : पुढारी वृत्तसेवा
बॉलिवूड कलाकारांना मिळणाऱ्या धमक्या आणि अलीकडील गोळीबाराच्या घटनांमुळे चित्रपटसृष्टीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर आता अभिनेता आयुष्मान खुराना, टायगर श्रॉफ यांच्यासह अनेक कलाकारांनी अतिरिक्त सुरक्षा मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांकडे धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कलाकारांना 'एक्स' श्रेणीची सुरक्षा देण्याबाबत पोलिसांकडून विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व संरक्षण विभागाकडे काही कलाकारांनी विशेष सुरक्षेसाठी अर्ज केले आहेत. या अर्जाची सध्या छाननी सुरू आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनाही धमक्या मिळाल्या आहेत. अक्षय कुमार, रणवीर सिंह, तुषार कपूर आणि आमिर खान यांच्याही सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित कलाकारांना मिळालेल्या धमक्यांचे स्वरूप, त्यांची विश्वासार्हता आणि संभाव्य धोका यांचा आढावा घेतल्यानंतरच सुरक्षेची श्रेणी निश्चित केली जाणार आहे.
काय असते 'एक्स' सुरक्षा?
'एक्स' श्रेणीच्या सुरक्षेमध्ये सामान्यतः दोन सशस्त्र सुरक्षा कर्मचारी संबंधित व्यक्तीच्या संरक्षणासाठी तैनात केले जातात. मात्र, प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था ही संबंधित व्यक्तीला असलेल्या धोक्याच्या पातळीनुसार बदलू शकते. केवळ धमकी मिळाली म्हणून सुरक्षा दिली जात नाही, तर धमकीची सत्यता, संभाव्य हल्ल्याची शक्यता आणि संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेची गरज तपासली जाते.