BMC Standing Committee Pudhari
मुंबई

BMC Standing Committee: पालिकेच्या स्थायी समितीवर श्रद्धा जाधव; ठाकरेंकडून ‘तिजोरी’ची जबाबदारी सोपवली

किशोरी पेडणेकर स्थायी समितीपासून दूर; शिवसेना ठाकरे गटात नव्या समीकरणांची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांचे महापालिकेतील महत्त्व वाढले आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून जाधव यांना स्थायी समितीचे सदस्यपद देत त्यांच्याकडे महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुखपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु त्यांना पालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीपासून दूर ठेवण्यात आले. महापालिकेत पक्षाच्या गटनेत्यापेक्षा स्थायी समितीत पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवकाचे पक्षामध्येही विशेष महत्व दिले जाते.

स्थायी समितीकडे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असल्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही समिती अतिमहत्त्वाची समजली जाते. मुंबई महानगरपालिकेचा करोड रुपयांचा अर्थसंकल्प याच समितीमध्ये सादर होतो. एवढेच काय तर अर्थसंकल्पांतर्गत मिळणाऱ्या निधीचे कसे वाटप करावे, हे सर्वस्वी स्थायी समिती ठरवते.

मुंबईतील विकास कामांचे करोड रुपयाचे प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीत येतात. त्यामुळे येथे होणारे अर्थकारण जगजाहीर आहे. त्यामुळे या समितीवर सदस्याची नियुक्ती करताना तो तितक्याच ताकतीचा व अभ्यासू असावा लागतो. तर दुसरीकडे समितीचे सदस्य पद मिळण्यासाठी त्या नगरसेवकाची आपल्या पक्षाकडे तेवढी पत लागते. त्यामुळे श्रद्धा जाधव यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे मातोश्रीतले वजन वाढणार आहे.

2017 ते 2022 या कालावधीत जाधव यांना महापालिकेच्या मुख्य प्रवाहातून दूरच ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांच्यावर स्थायी समितीची पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत पालिकेतील पक्षाच्या प्रमुख किशोरी पेडणेकर यांचाही हस्तक्षेप राहणार नसल्यामुळे जाधव यांना एक हाती स्थायी समितीचे कामकाज बघता येणार आहे.

माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर मुख्य प्रवाहातून दूर

शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना पालिकेत एकाही वैधानिक समितीचे सदस्य पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे वरळीतील नाराज शिवसैनिकांना खूष करण्याचा तर मातोश्रीचा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा रंगली आहे. वरळीमधून माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी शिवसैनिकांनी जोरदार उठाव केला होता. परंतु शिवसेना ठाकरे गटाचे नेते वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हा विरोध डावलून वरळीकर यांना मुंबई महापालिकेमध्ये उमेदवारी दिली. त्यामुळे अनेकांनी राजीनामे दिले होते. शिवसैनिकांची नाराजी ठाकरेंसाठी राजकीय दृष्ट्या घातक असल्यामुळे शिवसैनिकांची मनधरणी करून त्यांना शांत करण्यात आले होते. परंतु वरळीकर यांच्यावरील शिवसैनिकांची नाराजी कायम आहे. त्यामुळे वरळीकर यांना दूर ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ठाकरेंनी पालिकेचा इतिहास बदलला

स्थायी समितीच्या सदस्यपदी पक्षाच्या गटनेत्याची आवर्जून नियुक्ती केली जाते. समितीमध्ये पक्षाची बाजू मांडण्यासाठी गटनेताच महत्त्वाची भूमिका बजावतो. परंतु ठाकरेंनी गटनेत्या किशोरी पेडणेकर यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती न करून पालिकेचा इतिहासच बदलला आहे. कोरोना काळात किशोरी पेडणेकर यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळेच मातोश्रीने त्यांना समिती सदस्य पदापासून दूर ठेवल्याचे बोलले जात आहे.

पूजा महाडेश्वर शिक्षण समितीवर

दिवंगत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना महापालिकेच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षण समितीचे सदस्य पद देण्यात आले आहे. या अगोदर पूजा महाडेश्वर शिक्षण समितीच्या अध्यक्षही होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT