मुंबई : राजेश सावंत
वयाच्या शंभरीत असलेले मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील पालिका कर्मचाऱ्यांचे क्रीडा भवन आता इतिहासजमा होणार आहे. येथे टाऊनहॉल उभारला जाणार आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पालिकेने 1926 मध्ये क्रीडा भवनाची निर्मिती केली होती. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली. मात्र 2010 मध्ये क्रीडा भवनाच्या कार्यकारिणीमधील सदस्यांवर झालेल्या गैरकारभाराच्या आरोपानंतर क्रीडा भवनाला टाळे ठोकण्यात आले ते आजतागायत उघडले नाही. आता हे क्रीडा भवन पाडून तेथे टाऊनहॉल उभारला जाणार आहे. त्यामुळे गेल्या 100 वर्षांपासून कर्मचारी व क्रीडा भवनमध्ये असलेले घट्ट नाते आता तुटले जाणार आहे.
कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल या क्रीडा भवनाचे सदस्य असलेल्या कर्मचारी सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय खेळाडू कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रिया पालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी महादेव गोळवसकर यांनी व्यक्त केली.
क्रीडा भवनाची आझाद मैदानालगत व शिवाजी पार्क येथे इमारत आहे. यापैकी शिवाजी पार्क येथील क्रीडा भवनाच्या जागेत महापौर बंगला बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन्ही क्रीडा भवने गमवावी लागणार आहेत.
क्रीडा भवन पाडून तेथे टाऊनहॉल उभारला जाणार आहे. यासाठी 33 कोटी 66 लाख 68 हजार रुपये खर्च करण्यात येणार असून या टाऊनहॉलमध्ये भव्य सभागृह, आधुनिक उपाहारगृह, व्ह्यूईंग गॅलरी आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
पालिकेच्या या क्रीडा भवनातून अनेक खेळाडू घडले आहेत. यात कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, फुटबॉल, क्रिकेट अशा सर्वच क्रीडा प्रकारांतील खेळाडूंच्या प्रयत्नाने या क्रीडा भवनाची वास्तू महानगरपालिकेकडून तयार झाल्यानंतर क्रीडा भवनाचे मुख्यालय म्हणून या वास्तूने क्रीडा क्षेत्रातील सर्व क्रीडा प्रकारात देदीप्यमान यश पाहिलेले आहे.
क्रीडा भवनचे 10 हजार सदस्य असून अडीच हजारांपेक्षा जास्त आजीव सदस्य आहेत. 1995 मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना या क्रीडा भवनाच्या जागेसह आजूबाजूच्या जमिनीवर मुंबई महापालिकेचे प्रशस्त सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव महापालिकेत आलेल्या आयुक्तांनी पुढे सरकवलाच नाही.
मुंबई महानगरपालिकामध्ये 1990 पर्यंत स्वतःचे क्रीडा धोरण होते. पालिकेच्या कर्मचारी भरतीमध्ये खेळाडूंसाठी राखीव कोटा ठेवण्यात आला होता. त्यामुळे अनेक नामवंत खेळाडूंना हक्काची नोकरी मिळून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला होता. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेले आहे.