BMC spares mosque in Dawood ancestral building  
मुंबई

BMC spares mosque in Dawood ancestral building | मुसाफिरखान्यातील मशिदीला महापालिकेचे अभय

मुसाफिरखान्यातील मशिदीला महापालिकेचे अभय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बुधवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर रात्री उशिरा महानगरपालिका प्रशासनाने कुख्यात डॉन दाऊदचे वडिलोपार्जित घर असलेली मुसाफिरखाना इमारत पाडण्याचा निर्णय घेतला. या इमारतीत असलेली मशीद जैसे थे ठेवून उर्वरित जीर्ण इमारत पाडण्याचा निर्णय झाल्याने गुरुवारी सकाळीच महापालिकेचे बुलडोझर भेंडीबाजारच्या पाकमोडिया स्ट्रीटवर धडकले आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे शेवटी पाडकाम अर्धवट टाकून परत फिरले.

मुसाफिरखाना इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मस्जिदीमुळे पाडकामास मुस्लिम समाजाने केलेला विरोध, आमदार अमीन पटेल यांनी केलेला हस्तक्षेप, यामुळे बुधवारी होणारी कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. या कारवाईदरम्यान कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी रात्री मॅरेथॉन बैठक झाली. अखेर विधी विभागाने दिलेल्या ग्रीन सिग्नलमुळे गुरुवारपासून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई होत असून एका दोन दिवसात संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

ठरल्याप्रमाणे पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक गुरुवारी सकाळी इमारतीजवळ पोहचले. तत्पूर्वी संपूर्ण परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला होता. कारवाई होत असल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या मुस्लिम नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो हाणून पाडला. अखेर बुलडोझर, गॅस कटर, भातोडा व अन्य साहित्याचा वापर करत सुमारे ५० ते ६० कामगारांनी इमारतीच्या पाडकामाला सुरुवात केली.

या कारवाईचे नेतृत्व पालिकेच्या सी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील माने करीत असून् पालिका आयुक्त अश्विनी भिडे या कारवाईवर लक्ष ठेवून होत्या. गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे दक्षिण विभागाचे पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

३५४ अंतर्गत नोटीस बजावून कारवाई

कारवाईसाठी महापालिकेने महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ३५४ अंतर्गत नोटीस बजावली होती. सध्या मशिदमधील नागरिकांना पर्यायी जागा म्हणून अॅन नस्र टॉवरमधील तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

पुनर्विकास प्रकल्पाचाही संबंध

भेंडी बाजार समूह (क्लस्टर) पुनर्वसन प्रकल्पांतर्गत मुसाफिरखाना इमारत येते. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टकडे या परिसराच्या पुनर्विकासाची जबाबदारी आहे. या इमारतीचा काही भाग रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याचेही सांगण्यात येत आहे त्यामुळेच इमारतीवर तातडीने कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT