मुंबई: मुंबई महापालिका शाळांमधील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आता महापालिकेच्या जलतरण तलावामध्ये विनाशुल्क पोहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासनानेही अनुकूलता दर्शवली आहे.
महापालिकेच्या शिवाजी पार्क येथील महात्मा गांधी जलतरण तलावासह अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुल व मुलुंडच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलमध्ये असलेल्या ऑलिंपिक दर्जाच्या जलतरण तलावामध्ये शुल्क आकारून पोहण्याची परवानगी देण्यात येते. एवढेच नाही तर उन्हाळ्यामध्ये प्रशिक्षण शिबिरही आयोजित करण्यात येतात.
पण याचा लाभ मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना घेता येत नाही. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहण्याची कला अवगत असावी, यासाठी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांना विनामूल्य पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे पत्र विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे यांना दिले होते.
याबाबतचा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. बैठकीत विद्यार्थ्यांना मोफत पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात मुद्दा लावून धरण्यात आला. यावर पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे सुट्टीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत होण्याचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांचा आढावा घेऊन निर्णय
जलतरणसाठी पालिका शाळांमधील किती विद्यार्थी उत्सुक आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचा आढावा घेण्यात येणार आहे. यात जलतरणसाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून जवळ असलेल्या जलतरण तलावांमध्ये मोफत जलतरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.