BMC  pudhari photo
मुंबई

BMC News: महापालिकेतील 26 पदनामे इतिहासजमा; 'सफाईगार' हेच एकमेव नवे पदनाम

मज्जाक, संमार्जक, 'मेहतर' आणि 'हलालखोर' नव्हे... २५ सफाई पदांना एकच नाव : सफाईगार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पालिकेच्या विविध खात्यांमध्ये, विभागांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या जुन्या व काही अंशी जातीवाचक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या तब्बल २६ पदनामांने आता इतिहास जमा होणार असून आता 'सफाईगार' या एकाच सन्मानजनक आणि समान पदनामात रूपांतर करण्यात येणार आहे. यामुळे प्रशासकीय स्तरावरील संभ्रम दूर होऊन संपूर्ण कामकाजात सुसूत्रता येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार पालिकेत वारसाहक्क धोरणांतर्गत अनेक पदे सध्या कार्यरत आहेत. मात्र, एकाच स्वरूपाचे सर्वसाधारण कामकाज असूनही विविध विभागांमध्ये मेहतर, मज्जाक, संमार्जक, सफाईगार-नि-शौचालय स्वच्छक, प्राणी परिचर अशा विविध २६ वेगवेगळ्या नावांनी ही पदे संबोधली जात होती. प्रशासनाच्या मते, यातील 'मेहतर' आणि 'हलालखोर' यांसारखी पदे जातीवाचक असून यामुळे प्रशासकीय आणि सामाजिक संभ्रम निर्माण होत होता.

यावर उपाय म्हणून प्रशासनाने शिक्षण विभागातील 'हमाल' आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील 'मोटारीत कचरा भरणारे' ही दोन पदे वगळता, इतर सर्व २५ सफाई पदांचे एकत्रीकरण करून त्यांना 'सफाईगार' हे एकच समान नाव देण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय, 'धकव्या मुकादम' या पदाचे नाव बदलून आता 'सफाईगार मुकादम' असे केले जाणार आहे.

या ऐतिहासिक बदलासोबतच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भत्त्यांमधील जुनी विषमताही प्रशासनाने मोडीत काढली आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही क्षेत्रांतील आस्थापनांवरील भत्त्यांमध्ये पूर्वी असलेली तफावत दूर करून आता सर्व पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने भत्ते लागू केले जातील. त्यानुसार पात्र सफाई कामगारांना दरमहा ६०० रुपये घाणकाम भत्ता आणि दरमहा २३० रुपये धुलाई भत्ता दिला जाईल.

हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, स्थायी समितीची अधिकृत मंजुरी मिळताच या सुधारित भत्त्यांची आणि नवीन पदनामांची अंमलबजावणी तत्काळ सुरू केली जाईल. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो कामगारांना हक्काचा आर्थिक लाभ तर मिळेलच, शिवाय त्यांना समाजात आणि पालिकेत एक नवी व्यावसायिक प्रतिष्ठाही प्राप्त होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT