कांदिवली : मुंबई महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे कांदिवली विभागात महापालिकेने धडक कारवाई करत बॅनर, जाहिराती, फ्लेक्स, पोस्टर, स्टिकर्स, किऑक्स, फलक आणि ध्वज काढले आहेत. अजूनही सदर कारवाई सुरूच आहे. या कारवाईने सर्व परिसर स्वच्छ, सुंदर झाला आहे. बॅनर, होर्डिंग, पोस्टर जाहिरातींमुळे विभागातील नाके, रस्ते, विजेचे खांब, दुभाजक, उड्डाणपूल, सिग्नल व सुशोभिकरण केलेल्या चौकांनी बऱ्याच महिन्यांनी मोकळा श्वास घेतल्याने स्थानिक नागरिकांसह, प्रवासी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्य निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई कार्यक्षेत्रात ही मोहीम सुरू आहे. आचारसंहितेचा भंग होणारं नाही याची दक्षता पालिकेने घेतल्याने परिसर विदु्रपीकरणापासून मुक्त झाला आहे.
कांदिवलीत करोडो रूपये खर्च करून निर्माण केलेल्या चौकात, स्काय वॉक, सिग्नल चौक, विजेचे खांब आणि नाक्यानाक्यांवर बांबूचे ढाचे उभारून वर्षभर बॅनरबाजी, जाहिराती, फ्लेक्स व झेंडे लावून विद्रुपीकरण करण्यात येते. या विद्रुपीकारणामुळे प्रवासी व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. जिकडे तिकडे बॅनर व झेंड्यांमुळे सिग्नलही दिसत नव्हते.आता आचारसंहितेमुळे परिसर चकाचक झाला आहे.
बॅनर काढण्यात आल्याने चौक, नाक्यांवर बांबूचे ढाचे, चौकटी तशाच आहेत. अशोक नगर, अशोक चक्रवर्ती मार्ग, आत्मीय मार्ग, एस व्ही रोडवर अदानी कार्यालय, जीवन दास मटानी चौक, हिंदुस्थान नाका, चारकोप मार्केट येथे बांबूचे ढाचे, लाकडी फ्रेम तशाच आहेत. महापालिकेने बॅनरसह बांबूही काढावेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
कार्यक्रम, सण, उत्सव, व वाढदिवसाच्या जाहिरातींमध्ये तसेच राजकीय नेत्यांना हव्याहव्याशा असलेल्या प्रसिद्धीमुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले होते. आचारसंहिता लागू झाली आणि सर्व काही स्वच्छ, बॅनरमुक्त झाले. सरकारने वर्षभर बॅनरमुक्त मोहिम राबवावी.यतीन भिंगार्डे, सुज्ञ नागरिक