मुंबई : खाद्यपदार्थाचा दर्जा राखला जात नसल्यामुळे मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनला अन्न व औषध नागरी पुरवठा प्राधिकरणाने गुरुवारी सील ठोकले. तसेच त्यांचा परवानाही १५ दिवसासाठी निलंबित केला. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी धडक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील एनएक्स इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी कॅन्टीन चालवण्यात येते. या कॅन्टीनचा ठेका कमल कॅटर्स यांना देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी कॅन्टीनमध्ये कर्मचारी जेवण करत असताना ताटामध्ये माशी सापडली होती. त्यानंतर भजीमध्ये प्लास्टिकचा धागा सापडला होता. याबाबत तक्रार करूनही कॅन्टींग चालकाने फारसी दखल घेतली नाही.
या अगोदरही खाद्यपदार्थाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या होत्या. परंतु याची मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभाग व कॅन्टीन चालकाने दखल घेतली नाही. अखेर याबाबतच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्यानंतर हे एफडीएने कॅन्टीनवर दोन दिवसापूर्वी धाड टाकली.
कामगार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
कॅन्टीनमधील निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थबाबत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी कामगार अधिकाऱ्याकडे चौकशी केली. परंतु कामगार अधिकाऱ्यांना याबाबत काहीच माहीत नव्हते. यावेळी शिंदे यांनी माहिती घेऊन आपल्याला कळवावे असे सांगितले तरीही कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे स्थायी समितीत गुरुवारी शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सदस्यांनी थेट कामगार अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी लावून धरली.
कर्मचाऱ्यांचे खाण्याचे वांधे
पालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये बाहेरील हॉटेलपेक्षा स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांची गर्दी असे. अगदी आझाद मैदानात बंदोबस्ताला उपस्थित असलेले पोलीसही यास कॅन्टींगमध्ये येऊन नाश्ता व जेवण करत होते. मुंबई महापालिका सभागृह असताना नगरसेवकही याच कॅन्टीनमध्ये येत होते. परंतु ही कॅन्टीन बंद झाल्यामुळे आता सर्वांच्याच खाण्याचे वांधे झाले आहेत.