मुंबईत प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला Pudhari File Photo
मुंबई

BMC elections 2025 : मुंबईत प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला

निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला दिले निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांचे सोडत पद्धतीने आरक्षण काढण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार 11 नोव्हेंबरला ही सोडत काढली जाणार आहे.

हे आरक्षण कशाप्रकारे असावे, याची रूपरेषा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले 17 प्रभाग अगोदरच त्या त्या प्रभागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असलेल्या लोकसंख्येनुसार निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित 210 प्रभागांची लॉटरी काढण्यात येणार असून सुप्रीम कोर्टाच्या 6 मे 2025 च्या निर्देशानुसार नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) 27 टक्के जागा राखीव होणार आहेत. त्यामुळे ओबीसीसाठी 61 प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहेत. यात 50 टक्के ओबीसी महिलांसाठी प्रभाग राखीव राहणार आहेत.

149 प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी

राहणार आहेत. यात 50 टक्के प्रभाग खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. त्यामुळे खुल्या प्रवर्गासाठी 75 प्रभाग शिल्लक राहणार आहेत. या प्रभाग आरक्षण सोडतीसाठी स्थळ व वेळ निश्चित करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. प्रभाग आरक्षणापूर्वी वर्तमानपत्र व सोशल मीडिया, महापालिका मुख्यालय विभाग कार्यालय आदीच्या नोटीस बोर्डद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी.

सोडतीचे इतिवृत्त लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक प्रवर्गातील महिलांच्या जागांची सोडत काढल्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या जागांचे आरक्षण नमूद करुन आरक्षणाचे प्रारुप महानगरपालिका आयुक्त यांनी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेऊन राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या दिनांकास प्रसिध्द करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

हरकती, सूचना नोंदवता येणार

प्रभाग आरक्षण पार पडल्यानंतर नागरिकांना आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी महापालिकेकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे आरक्षणावर हरकती व सूचना नोंदवणे शक्य होणार आहे. हरकती व सूचना नोंदवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

नव्याने आरक्षण काढणारी पहिली निवडणूक

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे प्रभाग वगळता नव्याने आरक्षण काढणारी ही पहिली निवडणूक आहे. त्यानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये चक्राणुक्रमानुसार आरक्षण काढण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीमध्ये यावेळी आरक्षित होणाऱ्या प्रभागात अन्य आरक्षण अथवा तो प्रभात खुल्या प्रवर्गात जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी हे प्रभाग होऊ शकतात राखीव

  • अनुसूचित जमाती (एसटी) : 53 आणि 121

  • अनुसूचित जाती (एससी) : 26, 93, 118, 133, 140, 141, 146, 147, 151, 152, 155, 183, 186, 189, 215,

टप्पा कार्यवाही कालावधी

  1. प्रारुप आरक्षणास मान्यता घेणे आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगास प्रस्ताव सादर करणे - 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025

  2. आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रांद्वारे सूचना प्रसिद्ध करणे - 6 नोव्हेंबर 2025

  3. आरक्षणाची सोडत सोडत काढणे आणि निकाल आयोगास पाठविणे - 11 नोव्हेंबर 2025

  4. प्रारुप आरक्षण जाहीर करणे आरक्षणाचा तपशील प्रसिध्द करणे व हरकती मागविणे - 14 नोव्हेंबर 2025

  5. हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत नागरिकांकडून हरकती व सूचना स्वीकारणे - 20 नोव्हेंबर 2025

  6. हरकतींवरील निर्णय आयुक्तांकडून हरकतींचा निपटारा - 21 ते 27 नोव्हेंबर 2025

  7. अंतिम आरक्षण अधिसूचना शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध करणे - 28 नोव्हेंबर 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT