BMC election Thackeray Brothers Rally:
मुंबई: "बाकी कोणत्याही गोष्टींकडे लक्ष देऊ नका, ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे आणि आपल्या गल्लीची आहे. कोणत्याही खोट्या आश्वासनांना बळी पडू नका," असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आज (दि. 11) मुंबईकरांना केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांची दादर येथील ‘शिवतीर्था’वरील संयुक्त सभेत ते बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "भाजपच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. त्यांनी फक्त आश्वासने दिली, मात्र आम्ही केलेली कामे आज मुंबईकरांच्या समोर आहेत. जनता आमचे काम पाहूनच निर्णय घेईल."
सभेत आदित्य ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री (नक्कल) करत टोला लगावला. घुसखोरांच्या मुद्द्यावरून त्यांनी गृहमंत्र्यांना धारेवर धरले. "तुम्ही राज्याचे गृहमंत्री होतात, मग इतक्या काळात बांगलादेशी घुसखोरांना का पकडू शकला नाही?" असा थेट सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला.
आम्ही पाण्यावर कोणताही कर लावलेला नाही. आम्ही ९२ हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. आधी तुम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या यानंतर आमच्यावर टीका करा, असेही आदित्य ठाकरेंनी सुनावले. यावेळी त्यांनी शिवसेना सत्ता काळातील विकास कामांची माहितीही दिली.