मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गामधील इच्छुक उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. या आरक्षणाकडे विशेषतः २०१७ मध्ये निवडून आलेल्या माजी नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी दरवेळी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात येते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत नगरसेवकांना आपला प्रभाग गमावण्याची भीती असते. यावेळी प्रभाग आरक्षण सोडत काढली जाणार नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे माजी नगरसेवक खुशीत होते. विशेष म्हणजे खुल्या प्रवर्गातील इच्छुकांनाही निवडणूक लढवण्याची संधी मिळणार होती. मात्र प्रभाग आरक्षण सोडत यावर्षीही काढण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे टेन्शन वाढले आहे. २०१७ मध्ये जे प्रभाग खुल्या प्रवर्गात होते ते आरक्षणात जाण्याची शक्यता आहे.
तेथे महिला खुला प्रवर्ग व ओबीसी आरक्षण पडू शकते. महिला आरक्षण पडल्यास, खुल्या प्रवर्गातील माजी नगरसेवक आपल्या पत्नी किंवा मुलीसाठी उमेदवारी मागू शकतात. मात्र ओबीसी आरक्षण पडले तर खुल्या प्रवर्गातील माजी नगरसेवकासह इच्छुक उमेदवाराला घरी बसावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवताना ओबीसी उमेदवाराला फारसे टेन्शन नसते. एखाद्या पक्षात तगडा ओबीसी उमेदवार असेल, अशा उमेदवाराला पक्ष खुल्या प्रवर्गातूनही उमेदवारी देऊ शकतो. त्यामुळे खुल्या प्रवर्गात निवडणूक लढवू पाहणाऱ्या इच्छुकांची निराशा होऊ शकते
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये २३६ पैकी १२६ प्रभाग आर-क्षणामध्ये गेले होते. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ११० प्रभागावर समाधान मानावे लागणार होते. या आरक्षणात अनेक दिग्गजांचे पत्तेही कट झाले होते. परंतु हे आरक्षण आता रद्द झाल्यामुळे पुन्हा एकदा महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी संधी मिळणार आहे