मुंबई : नालेसफाईची कामे उत्तमरीत्या सुरू असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. एवढेच नाही तर गाळ किती उपसला, याची रोजच्या रोज टक्केवारीही जाहीर करत आहे. मात्र प्रत्यक्षात नाले गाळ व कचर्याने भरलेले असून हीच काय महापालिकेची नालेसफाई.. असा सवाल आता मुंबईकरांनी केला आहे.
मुंबई शहर व उपनगरात नालेसफाईचे कामे सुरू असून आतापर्यंत सुमारे 45 टक्के गाळ उपसण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. पण प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. अनेक नाल्यांना अजून महापालिकेच्या कंत्राटाने हातही लावलेला नाही. त्यामुळे हे नाले आजही गाळाने तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक नाल्यातून गाळ काढला जातो की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मालाड कुरार व्हिलेज, मालवणी, सायन वडाळा, मानखुर्द, गोवंडी आदी भागासह अनेक भागातून जाणार्या मोठे व छोट्या नाल्यातील गाळ उपसण्यात न आल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केला आहे.
सायन प्रतीक्षा नगर येथील कोकरी आगार परिसरातील म्हाडा संक्रमण शिबिर लगत जाणार्या नाल्याची अवस्था तर बिकट आहे. सायन येथील खारु क्रीक या नाल्यातून चिमूटभरही गाळ बाहेर काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिसरात यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई शहर व उपनगरात अशीच काहीशी परिस्थिती नाल्यांची असून कंत्राटदारांनी या नाल्यांच्या साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी केला आहे. दरम्यान नाल्यातून किनार्यावर काढून ठेवलेला गाळ आजही तसाच पडून असून हा गाळ तातडीने उचलला नाही तर पावसाळ्यात तो पुन्हा नाल्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे. याकडेही पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाचे माजी नगरसेवकांसह नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
नाल्याचा नाल्यालगत परिसरात कचरा व गाळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उंदरांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे लेप्टोसह अन्य संसर्गजन्य आजार फोफावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नालेसफाई सोबत उंदरांचाही बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.