मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ चा ८० हजार ९५२ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षासाठी विकास कामांसाठी ४८ हजार १६४ कोटी २८ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे गेल्या तीन वर्षापासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांना अतिरिक्त आयुक्त मार्फत अर्थसंकल्प सादर केला जात होता. मात्र या अर्थसंकल्पावर चर्चा झालीच नाही. मात्र तब्बल चार वर्षानंतर आता महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मुंबई शहराच्या विकासाचा अर्थसंकल्प सादर केला. यात जुन्याच कामांना प्राधान्य देण्यात आले असून वेसावे दहिसर व दहिसर भाईंदर कोस्टल रोडसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मुंबई मलनिःसारण प्रकल्प, पाणीपुरवठा प्रकल्प, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, आरोग्य, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतीचा पुनर्विकास गलिच्छ वस्ती सुधारणा आदींसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पाचे आकारमान सुमारे ८.७७ टक्केने वाढले आहे. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प फुगत चालला असून २०२४-२५ मध्ये अर्थसंकल्पाचे आकारमान ६५ हजार १८० कोटी ८० लाख रुपये तर २०२५-२६ मध्ये ७४ हजार ४२७ कोटी ४१ लाख रुपये इतके होते. आता अर्थसंकल्प ८० हजार ९५२ कोटी रुपयावर पोहचला आहे. म्हणजेच मागील आर्थिक वर्षापेक्षा या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाचे आकारमान ८.७७ टक्केने जास्त आहे. विकास कामांच्या तरतुदीमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी ४३ हजार १६२ कोटी २३ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती. यावेळी ४८ हजार १६४ कोटी २८ लाख रुपयाची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.