BMC Blood Bank Pudhari
मुंबई

BMC Blood Bank: भाभा रुग्णालयाच्या रक्तसंकलनात ३६ टक्क्यांनी घट; पालिकेचे दुर्लक्ष

रक्तपेढी एका शिफ्टमध्ये सुरू असल्याचा परिणाम; कोट्यवधींच्या सुविधा धूळखात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: महापालिकेच्या रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयाच्या रक्तपेढीनंतर वांद्रे येथील भाभा रुग्णालयाची रक्तपेढीही प्रशासनाच्या उदासीनतेची शिकार ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

गेल्या दोन वर्षांत रक्तसंकलनात ३६ टक्क्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे रक्तघटक निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी जागा उपलब्ध असूनही ती वर्षानुवर्षे रिकामी पडून आहे.

गेल्या पाच वर्षांपासून रक्तपेढी एका शिफ्टमध्ये सुरू असल्याने रक्तसंकलनावर परिणाम झाल्याचे समजते. उपलब्ध आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत रक्तपेढीत १,११० युनिट रक्तसंकलन झाले होते.

त्यानंतरच्या वर्षात ते ८७० युनिटवर घसरले, तर पुढील कालावधीत केवळ ७२९ युनिट रक्तसंकलन झाले. म्हणजेच दोन वर्षांत ३८१ युनिट किंवा ३६ टक्क्यांची लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. याबाबत रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विनोद खाडे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

विभाजन केंद्राची २,१२० चौरस फूट जागा वापराविना पडून

रुग्णांना अत्यावश्यक रक्तघटकांपासून वंचित ठेवणारी उदासीनता रक्तपेढीच्या नव्या इमारतीत रक्तघटक विभाजन केंद्रासाठी २,१२० चौरस फूट जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र आजतागायत ही जागा वापराविना पडून आहे.

त्यामुळे थॅलेसेमिया रुग्णांसाठी आवश्यक पॅक्ड रेड सेल्स, डेंग्यू रुग्णांसाठी प्लेटलेट्स तसेच फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा (एफएफपी) तयार करण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. परिणामी रुग्णांना या अत्यावश्यक रक्तासाठी अन्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे.

२३ हजारांचा दंडही थकबाकीत

रक्तपेढीने रक्तसाठ्याची माहिती दररोज ऑनलाइन अद्ययावत ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र ही माहिती नियमितपणे न भरल्यामुळे मार्च २०२२ ते जून २०२६ या कालावधीत सुमारे २३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा दंड अद्याप भरलेला नसल्याचे सांगितले जाते.

पाच लाखांचा डीप फ्रीझर निष्क्रिय

रक्तपेढीसाठी साध्या रेफ्रिजरेटरची आवश्यकता असताना चुकून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा डीप फ्रीझर खरेदी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. प्लाझ्मा गोठविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या यंत्राचा उपयोग करण्यासाठी आवश्यक परवाना रक्तपेढीकडे नसल्याने हा डीप फ्रीझर वर्षानुवर्षे धूळ खात पडून असल्याचे समजते.

दोन वेळा रक्तपेढीचा परवाना निलंबित

रक्तपेढीतील मनुष्यबळाच्या नोंदींबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या आणि इतर त्रुटींमुळे अन्न व औषध प्रशासनाने अलीकडेच दोन वेळा रक्तपेढीचा परवाना तात्पुरता निलंबित केला होता. तसेच सुधारणा करण्याबाबत पालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT