मुंबई : महापालिका पथकाने रविवारी (दि.28) रोजी वांद्रेतील बुलेट ट्रेन प्रकल्प, उच्च न्यायालय व शासकीय वसाहत प्रकल्पाचे स्थळ व लगतच्या रस्त्यांची पाहणी केली. Pudhari News Network
मुंबई

BMC Air is Harmful : हवा हानीकारकच; कारवाईचा इशारा देत प्रशासन थेट रस्त्यावर

पूर्व उपनगरांत पाहणी, उपाययोजनांचे सक्तीचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उच्च न्यायालयाने मुंबईत हवा किती खराब आहे, हे तुम्ही रस्त्यावर उतरा म्हणजे कळेल असे कान टोचल्यानंतर महापालिका प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या जागांची पाहणी सुरू केली असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीच्या सक्त सूचना देण्यात येत आहेत.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी पथकासह रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही के. पूर्व आणि एच. पूर्व विभागात प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या पाहणीदरम्यान के. पूर्वचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला, एच. पश्चिमच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी व पर्यावरण संतुलन राखण्यासाठी कटिबद्ध आहे. मुंबईतील हवामान आरोग्यदायी राहावे, यासाठी पुढील काळातही नियमित पाहण्या, समन्वयात्मक कारवाई व कठोर अंमलबजावणी सुरू राहणार असल्याचे सांगितले. महापालिका पथकाने बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामकाज, उच्च न्यायालय व शासकीय वसाहत प्रकल्पाचे स्थळ, पानबाई शाळेच्या परिसरातील व लगतच्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच खेरवाडी जंक्शन येथील सर्व्हिस रोडची पाहणी करून तेथील स्वच्छता, धूळ नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. आवश्यक उपाययोजना करण्याचे संबंधितांना निर्देश दिले.

कठोर कारवाईचा इशारा

कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांच्या, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक तेथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर व संबंधित संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

बांधकाम स्थळांवर धूळ उडू नये यासाठी पाण्याची नियमित फवारणी, साहित्य झाकण्यासाठी हिरव्या जाळीचा (ग्रीन नेट) वापर, बांधकाम साहित्य वाहतूक करताना झाकणांचा वापर, तसेच रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता केली जात आहे की नाही, याची तपासणी यावेळी करण्यात आली. शाळा परिसर व दाट वस्ती असलेल्या भागात विशेष काळजी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

१८८ गुणवत्ता निर्देशांक

  • मुंबईच्या वाईट हवामानावर उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात महापालिका व प्रदूषण मंडळाचे कान टोचल्यानंतर पालिका प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. मात्र रविवारची मुंबईची हवा गुणवत्ता ही हानीकारकरच होती.

  • संकेतस्थळांवरील माहितीनुसार, रविवारचा हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १८८ इतका नोंदवला गेला. तर चेंबूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, माऊंट मेरी परिसर व वडाळा ही तीन ठिकाणे वाईट हवेत गणली गेली.

  • चेंबुरला हवा गुणवत्ता निर्देशांक सर्वाधिक खराब २३२ इतका तर माऊंट मेरी २१५ व वडाळा ट्रक टर्मिनल परिसरात २०१ इतका होता. मुंबईचे हे चिंताजनक हवामान गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT