Dawood Sheikh joins MNS Pudhari
मुंबई

Dawood Sheikh: भाजप-मनसे वादानंतर भाजयुमोला खिंडार; नितेश राणेंच्या निकटवर्तीयाचा मनसेत प्रवेश, शेकडो कार्यकर्तेही गेले

Dawood Sheikh joins MNS: भाजप युवक मोर्चाचे उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष आणि मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय दाऊद शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला.

Rahul Shelke

Dawood Sheikh joins MNS: भाजप आणि मनसेमधील वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजप युवक मोर्चाचे उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष आणि मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय दाऊद शेख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला आहे. दाऊद शेख यांच्यासह भाजप युवा मोर्चाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

मनसे नेते आणि विद्यार्थी सेना प्रमुख अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यामुळे मुंबईतील भाजपच्या युवा संघटनेला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दाऊद शेख यांचा भाजपला रामराम

दाऊद शेख हे भाजप युवक मोर्चामध्ये उत्तर-पश्चिम मुंबई उपनगरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच ते मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, आता त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षातील पदाचा राजीनामा देत मनसेत प्रवेश केला आहे.

त्यांच्यासोबत भाजप युवा मोर्चातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेमध्ये प्रवेश केला आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी मनसेची वाट धरली आहे.

भाजप-मनसे वादानंतर राजकीय वातावरण तापलं

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेमधील संघर्ष चांगलाच वाढला आहे. पुण्यातील एका शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लावण्यात आलेली प्रतिमा अमित ठाकरे यांच्या सूचनेनुसार हटवण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेत अमित ठाकरे यांचा निषेध केला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेविरोधात आंदोलन करत मनसेवर जोरदार टीका केली.

माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने

पुण्यातील या घटनेचे पडसाद मुंबईतही उमटले. माहीम परिसरात भाजप युवा मोर्चा आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

वादानंतर मनसेचा भाजपला धक्का

भाजप आणि मनसेतील संघर्ष सुरू असतानाच भाजप युवा मोर्चातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मनसेत झालेला प्रवेश भाजपसाठी धक्का मानला जात आहे. विशेषतः नितेश राणे यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या दाऊद शेख यांनी पक्ष सोडल्याने या प्रवेशाला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT