मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली असून, विविध जिल्ह्यांतील माजी आमदारांसह स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांना भाजपमध्ये आणले जात आहे. विशेषतः, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते भाजपच्या ‘रडार’वर आहेत. माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर हे मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोबतच, बुधवारी माजी मंत्री अण्णा डांगे हे आपल्या मुलांसह भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला असून, ते आठवडाभरात भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या वर्षअखेरीस राज्यातील 29 महापालिकांसह 32 जिल्हा परिषद व त्यांतर्गत असलेल्या पंचायत समित्यांसह नगर पंचायत, नगर षरिदांच्या पुढील तीन-चार महिन्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने विविध पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
आतापर्यंत माजी आमदार संग्राम थोपटे, कुणाल पाटील, संजय जगताप, जयश्री पाटील यांच्यासह काँग्रेसमधील अनेक नेत्यांना भाजपने आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे. त्यानंतर आता आठवडाभरात आणखी दोन माजी मंत्री व एक माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. परभणीतील माजी राज्यमंत्री, माजी खासदार सुरेश वरपुडकर, जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सांगलीतील माजी मंत्री अण्णा डांगे हे वयाच्या 89 व्या वर्षी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. डांगे हे जनसंघाच्या काळापासूनचे भाजप नेते राहिले आहेत. 1995 मध्ये युती सरकारच्या काळात ते मंत्री होते. पुढे 2002 मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकत लोकराज्य नावाचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर, 2006 साली त्यांनी आपला पक्ष विलीन करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे पुत्र चिमण डांगे इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष राहिले आहेत. आता डांगे हे आपल्या चिरंजीवांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. डांगे भाजपमध्ये जाणार असल्याने राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे.