मित्रपक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर भाजप नाराज pudhari photo
मुंबई

Political tensions in NDA : मित्रपक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर भाजप नाराज

मंत्र्यांकडील खात्यांत फेरबदलाची शक्यता; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौर्‍यामुळे चर्चांना उधाण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली/मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांनी अलीकडील काळात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपमध्ये नाराजीची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्ली भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या आणि वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा पूर्णपणे राज्यातील प्रकल्पांसाठी होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता तूर्त मंत्रिमंडळात कोणत्याही फेरबदलाची शक्यता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फेटाळून लावली आहे. मंत्रिमंडळात बदल होणार मित्रपक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर भाजप नाराज नसला, तरी काही मंत्र्यांच्या खात्यांत बदल होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दिल्ली दौर्‍यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील फेरबदलांच्या चर्चांना आणखी हवा मिळाली.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंत्र्यांची कार्यशैली आणि विधानांनी राज्य सरकारला अडचणीत आणले आहे. अशा वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दिल्ली दौरा याच पार्श्वभूमीवर होता, असा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. मात्र, सध्या तरी मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता नसल्याचे भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा राज्यातील विकास प्रकल्पांसाठी

मुख्यमंत्री फडणवीस यांचा दिल्ली दौरा हा राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी होता. त्यासाठीच केंद्रीय मंत्र्यांसह नीती आयोगासोबतच्या बैठकीकडेही अंगुलीनिर्देश केला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात सदिच्छा भेट घेतली. उभय नेत्यांची महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर, तसेच विषयांवर सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचीही सदिच्छा भेट असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

मंत्रिमंडळात कोणतेही बदल होणार नाहीत : मुनगंटीवार

राज्यातील मंत्रिमंडळात बदल होणार असल्याच्या चर्चा माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फेटाळून लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा संजय राऊत यांचा दावा फेटाळताना, असा कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मंत्रिमंडळात कोणताही फेरबदल होणार नाही. कोअर ग्रुपच्या बैठकीत अशा कोणत्याही बदलाची चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळासंदर्भातील निर्णय हे राज्यस्तरावर नव्हे, तर केंद्रीयस्तरावर होतात. सध्या तरी असा कोणताही बदल होईल, असे मला वाटत नाही. विधानसभा अध्यक्षपदाबाबतही सध्या कोणतेही बदल होणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना ः अजित पवार

पुणे ः राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार हे सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहेत. कोणाला ठेवायचे, कोणाला नाही ठेवायचे, कोणाचे खाते बदलायचे याचा निर्णय ते घेतील. ते दिल्लीहून परत आल्यानंतर आम्ही याबाबत चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात शुक्रवारी सांगितले. त्यामुळे पुढच्या आठवड्यात खांदेपालट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT