मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  File Photo
मुंबई

शिंदे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश

फडणवीस - शिंदे यांच्यातील भेटीमुळे मनोमिलनाचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः नवी दिल्लीतील भेटीनंतर जवळपास एक आठवड्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी वर्षा निवासस्थानी भेट झाल्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीतील सगळे अडथळे आता दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहमंत्रालय मिळत नसल्याने नाराज असलेल्या शिंदेंची समजूत घालण्यात फडणवीस यशस्वी ठरल्याची चर्चा असली तरी याबाबत भाजप-शिवसेनातर्फे अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

भाजपने शिंदेंना देऊ केलेले उपमुख्यमंत्रिपद आणि खाती याबाबत शिंदे जवळपास सकारात्मक असल्याचे संकेतही या भेटीनंतर प्राप्त झाले आहेत. फडणवीसांचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनी ठाण्यात जाऊन आजारी असलेल्या शिंदेंची सोमवारी भेट घेतली. त्यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेत शिंदेंनी हवी असलेली खाती व त्यावर भाजपची भूमिका कोणती, भाजप काय देऊ शकतो आणि काय देऊ शकत नाही, याबाबत फडणवीसांचा संदेश महाजनांच्या माध्यमांतून शिंदेना देण्यात आल्याचे समजते. भाजपच्या संदेशाला शिंदेंनी दिलेले उत्तर, मंत्रिमंडळातील समावेशाबाबत शिंदे गटाची नावे यांची माहिती महाजनांनी फडणवीसांना दिली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा महाजन शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले. त्यानंतर मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि गृहमंत्रालय मिळत नसल्याने नाराज असलेल्या शिंदेंची समजूत घालण्यासाठी फडणवीसांनी स्वतः वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंशी चर्चा केली.

दिल्लीत झालेल्या भेटीनंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट झाली. दिल्लीत 26 नोव्हेंबर रोजी या दोघांची भेट झाली होती. शिंदे यांनी महाजन यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. दरम्यान, महाजन हे वर्षा निवासस्थानातून बाहेर पडण्यापूर्वीच फडणवीस तेथे दाखल झाले. त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले. शिंदे यांनी फडणवीस यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर रात्री आपल्या पक्षातील आमदारांसोबत खलबते केली. त्यांनी सरकारमध्ये सामील व्हावे, अशी आग्रही भूमिका त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांतर्फे मांडली जात आहे. खातेवाटप व शपथविधी याबाबत त्यांनी काही नेत्यांची मते शिंदे यांनी जाणून घेतल्याचे कळते.

अजित पवार दिल्लीत वेटिंगवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना शहा यांची वेळ न मिळाल्याने त्यांना किमान 24 तास तरी वेटिंगवर ठेवण्यात आल्याचे चित्र आहे.

शिंदेंना काय मिळणार?

मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला तयार झालेले एकनाथ शिंदे यांना नेमके काय मिळणार, याबाबत गोपनीयता पाळली जात आहे. एमएसआऱडीसीचे नियंत्रण करणार्‍या सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या विभागासह त्यांना महसूल विभाग देण्याची तडजोड होऊ शकते, अशीही चर्चा आहे.

नगरविकास उदय सामंतांना?

शिवसेना शिंदे गटाला नगरविकास मंत्रालय मिळत असले तरी हा विभाग शिंदे यांच्याऐवजी उदय सामंत यांच्याकडे सोपविला जाईल, अशी चर्चा आहे. सामंतांना नगरविकास विभाग हवा असून शिंदेंऐवजी हा विभाग त्यांच्याकडे देण्यासाठी भाजपही सकारात्मक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT