एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस  
मुंबई

Municipal Corporation Election : मुंबई, ठाण्यात ‘महायुती’चे ठरले; दोन दिवसांत घोषणा

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ‌‘घड्याळ‌’ की ‌‘तुतारी‌’वरून वाद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह ठाणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भाजप-शिवसेना युती निश्चित झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांत या युतीचा फॉर्म्युला जाहीर केला जाऊ शकतो. त्याचवेळी कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर महापालिकेत मात्र जागांची रस्सीखेच सुरू असल्याने युतीत तणाव निर्माण झाला आहे. त्याचवेळी भाजपने कल्याणच्या महापौरपदावरही दावा केला आहे. त्यामुळे या ठिकाणी युतीबाबत अजूनही अनिश्चितता आहे.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आघाडी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात ‌‘घड्याळ‌’ की ‌‘तुतारी‌’ या चिन्हावरून लढवाव्यात, यावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाद सुरू असल्याचे समजते.

युतीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह काही महापालिकांमध्ये शिवसेनेशी युती होणार आहे. आमची युती आहेच, आता फक्त जागावाटप घोषित करायचे बाकी आहे, असे स्पष्ट केले. मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढण्याची शक्यता आहे. भाजप आपल्या कोट्यातून काही जागा रामदास आठवले यांच्या रिपाइंला सोडणार आहे. तर ठाण्यात भाजपला 41 ते 41 जागा शिवसेना 90 जागा लढणार आल्याचे समजते.

ठाण्यात भाजपने युतीसाठी शिवसेनेला शनिवारपर्यंत अल्टिमेटम दिला असला तरी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा अल्टिमेटम नाकारला आहे. ठाण्यात युती करण्यावर प्रदेश पातळीवर एकमत झाले आहे. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजप - शिवसेना युती होणार असल्याचे शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. दोन-तीन जागांवर आमची बोलणी चालू आहे. त्यावर मी आणि भाजप नेते मंत्री अतुल सावे चर्चा करून निर्णय घेऊ, असे शिरसाट म्हणाले. दोन्ही पक्षाला समसमान जागा देऊन युती व्हावी, असा भाजपचा आग्रह आहे.

कल्याणमध्ये भाजपने 50 टक्के जागा मागितल्या आहेत. एवढ्या जागा सोडण्यास शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपने कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावर देखील दावा सांगितला आहे; तर नवी मुंबईमध्ये शिवसेनेने केलेला 50 टक्के जागांचा दावा भाजपला मान्य नाही. मीरा भाईंदर महापालिकेतही भाजपने जागा वाटपावर तडजोड करण्यास नकार दिला आहे. हा पेच सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा झाली असली तरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पुण्यात शिवसेनेला 15 तर नाशिकमध्ये 40 जागा सोडायला भाजप यार आहे. शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नसल्याने तेथेही युतीचे गाडे अडले आहे.

राष्ट्रवादीमध्ये वाटाघाटी सुरूच

अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण -डोंबिवली आदी ठिकाणी युतीसाठी चर्चा सुरू आहे. मात्र त्यावर अजून तोडगा निघालेला नाही. पण पुण्यात शरद पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकाच घड्याळ चिन्हावर लढल्यास ही एक प्रकारे दोन्ही राष्ट्रवादीची विलीनीकरणाची नांदी ठरणार आहे. तसेच शरद पवार गटाने एक प्रकारे अजित पवारांचे नेतृत्व मान्य केल्याचे निश्चित होणार आहे. विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे सकारात्मक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय गोटातून मिळत आहे.

मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. आमच्यात कसलीही वादावादी नाही. आता केवळ अंतिम घोषण करायचे बाकी आहे. आमचे नीट चालले आहे आणि आमची युती आहेच. त्यामुळे रस्सीखेच होण्याचा प्रश्नच नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT