ठाणे महापालिका pudhari photo
मुंबई

TMC Election 2025 : ठाण्यात युती करायची की नाही ते शिंदे यांनी ठरवावे

भाजपने टाकला शिंदे सेनेच्या कोर्टात चेंडू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँडला आव्हान देण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढणार हे आता निश्चित केले झाले असले तरी ठाणे येथे मात्र भारतीय जनता पक्षाने युतीच्या निर्णयाचा चेंडू माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टाकल्याचे समजते.

या संदर्भात भाजपच्या राज्यातील तसेच केंद्रातील काही वरिष्ठ नेत्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क केला असून ठाण्याबाबत आपला जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असे सांगितले आहे. भाजपला ठाण्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना कुठल्याही परिस्थितीत नाराज करायचे नसून त्यांचे ठाण्यातील सत्ता केंद्र आणि जनतेच्या मनावरील अधिराज्य कायम रहावे, अशी भाजपची भूमिका असल्याचे समजते. देशातील राजकारणात भाजपकडे केंद्रात स्पष्ट बहुमत नसल्याने शिवसेना शिंदे गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची झाली आहे. सध्या सर्वाधिक जवळचे मित्र असलेले एकनाथ शिंदे यांनीच ठाण्याबाबत काय तो निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यामुळेच मांडण्यात आली आहे.

जागा वाटपाबाबत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत घालू. मात्र युती करायची शिंदे गटाची इच्छा नसल्यास तेथे निवडणुका स्वतंत्रपणे लढून निकालानंतर युतीच्या हालचाली करू, असे भाजपने कळवले असल्याचे समजते. दरम्यान, ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपाशी युती करायची का याबद्दलच्या निर्णयाचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवले आहेत असे विधान खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे.

महायुती राज्यात काही ठिकाणी एकत्र तर बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढणार असतानाच माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शक्तीकेंद्र असलेल्या ठाण्याचा निर्णय मात्र त्यांच्या इच्छेनुसार होणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. मात्र लगतच्याच कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेत निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाले आहे.

या महानगरपालिकेच्या परिसरात अन्य कोणत्याही पक्षाला विशेष स्थान नसल्यामुळे परस्परांनी सध्या एकमेकांविरोधात उभे राहून नंतर युती करावी असे जवळपास निश्चित केले आहे. मुंबई महानगरपालिकेची अतिशय महत्त्वाची लढाई स्वबळावर लढण्याऐवजी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे एकत्रितपणे लढणार आहेत.मुंबईत युती होणार हे जवळपास निश्चित आहे, हे वास्तव आता बदलणार नाही असा विश्वास दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना आहे.

मुंबई आणि कल्याण डोंबिवली या टप्प्याच्या मध्ये असलेले ठाणे मात्र अतिशय महत्त्वाचे ठिकाण झाले असून येथे काय करायचे हा निर्णय मोलाचा ठरणार आहे. 121 सदस्यांच्या ठाणे महानगरपालिकेत सध्या शिवसेना शिंदे गटाचे 81 सदस्य आहेत. निवडणुकीच्या वेळी एकसंध असलेल्या शिवसेनेने 67 ठिकाणी स्वतःचे अस्तित्व दाखवले होते.भारतीय जनता पक्षाला त्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या पंधरावरून 21 वर नेण्यात यश मिळाले होते. अँटीइन्कमबन्सी वातावरणामुळे शिंदे यांची ताकद काहीशी कमी होऊ शकेल अशी भीती त्यांच्या पक्षाला वाटते आहे त्यातच शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र आल्यास भावांची युती म्हणून वेगळा परिणाम होऊ शकेल.

ठाण्यातील काही निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सहानुभूती वेगळा दिशेला झुकते आहे, असे मानू शकतील असाही एक अंदाज व्यक्त केला जातो. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगट वेगळे लढले तर मते विभाजित होतील अशी परिस्थिती आहे, त्याच वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वबळावर लढायची तीव्र इच्छा आहे मात्र शिंदे यांचे युतीतील स्थान लक्षात घेता आणि भारतीय जनता पक्षाला असलेली मित्रांची गरज लक्षात घेता त्यांना दुखवायचे नाही असा धोरणात्मक निर्णय झाला आहे.

याबाबत नेमके काय करावे ते शिंदे यांनी सांगावे आम्ही त्या निर्णयाचा आदर करू असे त्यांना गेल्या आठवड्यात दोनदा सांगण्यात आले आहे. शिंदे यांनी ठाण्यात युतीची तयारी दाखवल्यास ते भाजपला ते मागतील त्या जागा देऊ शकतील का? हा मुद्दा आहे आणि युती करायची नाही असे ठरवल्यास भारतीय जनता पक्ष ठाणे परिसरात स्वबळावर पाय रोवू शकतो का? याचाही शिंदे यांना विचार करावा लागणार आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे यांना महत्त्व देताना ठाण्यात नेमके काय करायचे ते तुम्ही ठरवा आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत असेच सांगत स्वतःच्या पक्षाच्या वाढीचा पर्यायही खुला ठेवला असल्याचे मानले जाते.

भाजपने घेतलेल्या विभागवार बैठकांमध्ये ठाणे महानगरपालिकेतील कार्यकर्त्यांनी 121 जागांसाठी जवळपास 500 उमेदवार तयार आहेत. त्यांना नाराज करू नका अशी विनवणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना केली होती. त्याचवेळी दुसरीकडे शिंदे यांच्या काही निकटवर्तीयांनीही ठाण्यात आपल्याकडे 81 नगरसेवक असताना सवबळावर लढणे योग्य राहील. भारतीय जनता पक्षाशी युती केल्यास कार्यकर्त्यांना लढण्याची संधी कशी मिळेल अशीही भूमिका घेतली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT