मुंबई : मराठी महापौर होणार असल्याचे सांगत महापौर व उपमहापौर निवडणुकीतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेसने माघार घेतल्यामुळे अखेर मुंबई महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे व उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड निश्चित झाली आहे. मात्र याची अधिकृत घोषणा बुधवार 11 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेत 1997 पासून शिवसेनेसोबत सत्तेवर राहिलेल्या भाजपाला शिवसेनेने कधीही महापौरपद दिले नव्हते. मात्र यावेळी भाजपाचा मराठा, विशेष म्हणजे कोकणवासीय महापौर विराजमान होणार आहेत. घाटकोपर येथील नगरसेविका रितू तावडे यांचे सुरुवातीपासून महापौर पदासाठी नाव आघाडीवर होते. मात्र या स्पर्धेत अजून काही नगरसेविका आल्यामुळे भाजपाने अखेरपर्यंत महापौर पदाचे नाव गुपित ठेवले होते.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार रितू तावडे यांना महापौरपदी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपमहापौर पदासाठी यामिनी जाधव व तृष्णा विश्वासराव या जेष्ठ महिला नगरसेवकांचे नाव आघाडीवर होते. पण या दोन्ही नावांना शिवसेनेतून विरोध झाल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक संजय घाडी यांच्याकडे उपमहापौर पद सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजपाने सुरुवातीला हिंदू महापौर होणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे याला शिवसेनेचा विरोध होता. आता मराठी महापौर दिला आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही. आम्हाला आकड्यांची गणित मान्य असतात आणि आम्ही ती मान्य केली असल्याचे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान काँग्रेसनेही महापौर व उपमहापौर पदी उमेदवार उतरवणार नसल्याची जाहीर केल्यामुळे मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. बुधवार 11 फेब्रुवारीला महापालिका सभागृहात पिठासीन अधिकारी भूषण गगराणी महापौर व उपमहापौर यांची अधिकृत घोषणा करणार आहेत.
तावडे सातव्या महिला महापौर
मुंबईमध्ये गेल्या 50 वर्षांत अवघ्या सहा महिला महापौर झाल्या असून यात निर्मला सामंत प्रभावळकर, विशाखा राऊत, शुभा राऊळ, श्रद्धा जाधव, स्नेहल जाधव, किशोरी पेडणेकर यांचा समावेश आहे, तर आता सातव्यांदा रितू तावडे महापौरपदी विराजमान होणार आहेत.
भाजपाचा दुसरा महापौर, तर शिवसेनेचा पहिला उपमहापौर
मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात भाजपाचा दुसरा महापौर, तर शिवसेनेचा पहिला उपमहापौर विराजमान होणार आहे. 1982-83 मध्ये भाजपाचे प्रभाकर पै पहिले महापौर झाले होते. मात्र त्यावेळी महापालिकेत भाजपाची सत्ता नव्हती. यावेळी सत्तेसह महापौरपदी भाजपाचा महापौर राहणार आहे. पालिकेमध्ये आतापर्यंत शिवसेनेचा एकही उपमहापौर झाला नाही. यावेळी प्रथम शिवसेनेचा उपमापन होणार आहे.