Maharashtra Assembly Polls | मर्यादित फेरबदल; नाराजी टाळण्याचा प्रयत्न file photo
मुंबई

BJP Candidate List | मर्यादित फेरबदल; नाराजी टाळण्याचा प्रयत्न

विद्यमानांना संधी; १८ आमदार मात्र वेटिंगवर; तिघांचा पत्ता कट

गौरीशंकर घाळे

BJP Candidate List | विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी (BJP Candidate List) भाजपने जाहीर केली आहे. यंदा अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कापले जाणार, काही मंत्र्यांनाही घरचा रस्ता दाखविला जाणार, भाकरी फिरवली जाणार, अशा सर्व चर्चांना बगल देण्यात आली आहे. पहिल्या यादीत तब्बल 81 आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली असून, केवळ चार आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्याचवेळी एकूण 18 आमदारांच्या जागांवर अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या 18 आमदारांवर टांगती तलवार असल्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी बड्या नेत्यांची तिकिटे कापत धक्कातंत्राचा वापर करणार्‍या भाजपने यंदा मात्र तो मोह टाळत सावध खेळी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांना संधी नाकारली जाईल. त्यांच्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाईल, असे कयास लावले जात होते; मात्र या सर्व चर्चांना फोल ठरवत भाजपने आपल्या पहिल्या यादीत (BJP Candidate List) तब्बल 81 विद्यमान आमदारांना कायम ठेवले आहे, तर केवळ दोघा आमदारांचे तिकीट कापले आहे. यात चिंचवड मतदारसंघात अश्विनी जगताप यांच्या जागी त्यांचे दीर शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे, तर कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती, त्यामुळे जवळपास सहा जागांवर भाजपला फटका बसल्याची चर्चा होती. (Maharashtra Assembly Polls)

यंदा मात्र बावनकुळे यांना संधी देण्यात आली आहे; मात्र अद्याप 18 आमदारांच्या मतदारसंघांत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही, त्यामुळे या आमदारांपैकी बहुतांश आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. ज्या मतदारसंघांत उमेदवारीवरून पक्षांतर्गत किंवा महायुतीत रस्सीखेच अथवा कोणताच वाद नाही, अशा जागांना प्राधान्य देत पहिली यादी जाहीर (BJP Candidate List) करण्यात आली आहे. जिथे पक्षात किंवा महायुतीत दावे-प्रतिदावे केले जात आहेत तिथे मात्र अद्याप उमेदवार दिले गेले नाहीत. (Maharashtra Assembly Polls)

या आमदारांना ठेवले वेटिंगवर

18 आमदार अद्याप वेटिंगवर आहेत. यातील तब्बल 9 जागा या विदर्भातील आहेत. अकोट-प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूर-हरीश पिंपळे, वाशिम-लखन मलिक, आर्वी-दादाराव केचे, नागपूर मध्य-विकास कुंभारे, गडचिरोली-देवराव होळी, आर्णी-संदीप धुर्वे, नाशिक मध्य-देवयानी फरांदे, उल्हासनगर-कुमार लानी, बोरिवली-सुनील राणे, वर्सोवा-भारती लवेकर, घाटकोपर पूर्व-पराग शहा, पेण-रविशेठ पाटील, पुणे छावणी-सुनील कांबळे, गेवराई-लक्ष्मण पवार आणि माळशिरस-राम सातपुते. दरम्यान, कारंजा येथील आमदार राजेंद्र पाटणी यांचे लोकसभा निवडणुकीपूर्वी निधन झाल्याने ही जागा रिक्त होती. तिथे भाजप कोणता उमेदवार देणार याबाबत उत्सुकता आहे. (Maharashtra Assembly Polls)

या जागांवर केले फेरबदल

फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांच्या जागी अनुराधा चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. अलीकडे बागडे यांची राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पोलिस ठाण्यातच शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याने गणपत गायकवाड सध्या अटकेत आहेत. त्यामुळे आता शिंदे गट येथे काय भूमिका घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांच्या जागी प्रतिभा पाचपुते यांना संधी देण्यात आली आहे. भिवंडी पश्चिमेचे आमदार महेश चौघुले यांना भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Polls)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT