Indrayani River Bridge Collapse
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला. तर १८ जण जखमी झाले. यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची सही असलेले एक पत्र X वर पोस्ट केले. 'या पुलासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणतात; संबधित मंत्र्याचे पत्र पाहा, जनतेला मुर्ख बनवले जात आहे,' अशी टीका राऊत यांनी केली. राऊत यांनी पोस्ट केलेल्या पत्रात, कुंडमळा रस्ता आणि नदीवरील पूल दुरुस्तीसाठी केवळ ८० हजारांची तरतूद केल्याचे दिसते. त्याला आता भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत विनाकारण आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत विश्वप्रवक्ते आहेत. ते रोज बोलतच असतात, त्यांना रोज उत्तर दिलं तरी ते बोलतच राहतात, असे चव्हाण म्हणाले. पुलांच्या दिरंगाईमुळे निष्पाप लोक गेली. नव्या पुलाला दिरंगाई का केली? याची चौकशी होईल. हेतूपरस्पर कोणी दिरंगाई केली असेल तर कारवाई करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, जखमी लोक लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करतो. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना जे विषय माझ्याकडे यायचे त्यावर मी तात्काळ कारवाई करून विषय मार्गी लावायचो. स्थानिक भाजप नेते रविंद्र भेगडे यांनी माझ्याकडे पुलाबाबत निवेदन देताच मी विभागाला सांगून योग्य ती कारवाईचे निर्देश दिले आणि ८ कोटींच्या निधीबाबत कारवाई केली. बजेटमध्ये होणारी तरतूद हजारांमध्ये होते. या तरतुदीपेक्षा एक हजार पट रक्कम अशी ती तरतूद असते. हे समजून घेण्यासाठी आमचे नेते देवेंद्रजी यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा? यासाठी पुस्तक लिहिलंय. पुलाच्या कामाला मंजुरी दिलेली आहे, निधी प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि खात्याच्या सचिवांना फोन करून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. कामाला दिरंगाई का झाली? दोषी कोण? याची चौकशी केली जात आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.