मुंबई: राज्यात आणि केंद्रात सत्तासहभाग हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असा पर्याय भारतीय जनता पक्षाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससमोर ठेवला असल्याचे वृत्त आहे. तथापि, अजित पवार राष्ट्रवादीच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मात्र या प्रस्तावास विरोध असल्याचे समजते.
घटनादुरुस्ती विधेयकाच्या बाजूने संख्याबळ गाठीशी जमा करताना भाजपने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर विलीनीकरण, केंद्रात दोन मंत्रीपदे आणि एनडीएमध्ये घटकपक्ष म्हणून प्रवेश, असा प्रस्ताव ठेवल्याचे कळते. एनडीएमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र व एकसंध पक्ष म्हणून यावे ही भाजपची भूमिका आहे.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांशी चर्चा करीत आहेत. गुरुवारी जयंत पाटील यांना भाजपच्या सूचनेवरूनच ‘एनडीए’चा घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांना भेटायला पाठवण्यात आले होते.
शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाला आपला विरोध नसेल; मात्र सत्ता समतोल राहावा, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर या हालचालींना वेग आला, असे मानले जाते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने विलीन व्हायचे असेल, तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि अर्थमंत्रिपद आपल्यालाच मिळायला हवे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र खासदार पार्थ पवार यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मुद्दा सोपा नसल्याने त्यातून मार्ग निघणे कठीण असल्याचे पार्थ पवार यांना शुक्रवारी समजावून सांगण्यात आल्याचा अंदाज आहे. पार्थ पवार यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या संदर्भात प्रारंभिक चर्चा केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जर ‘एनडीए’मध्ये सामील होत असेल तर तो आमच्यावर अन्याय असेल, असे माय-लेकांचे मत असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नाराज करून कोणतीही घडामोड होणार नाही, अशी भूमिका भाजपच्या राष्ट्रीयस्तरावरील एका नेत्याने दै. ‘पुढारी’जवळ मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा तिढा सोडवायचा कसा? तसेच विधेयक मांडले गेले तर त्यासाठी शरद पवार यांचे नेतृत्व मानणाऱ्या आठ खासदारांचा पाठिंबा मिळवायचा कसा? यावर सध्या खल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नेत्यांनी पार्थ पवार यांच्या भूमिकेला विरोध करत सत्तेमध्ये जास्त योग्य वाटा मिळण्याचा शब्द दिला जाणार असेल तर पुढची पावले टाकायला हरकत नाही, शरद पवार यांच्या गटाच्या विलीनीकरणाला विरोध करून उपयोग नाही, अशीही भूमिका घेतली आहे.
त्यामुळे येत्या दोन दिवसांत यासंदर्भात नक्की कोणत्या घडामोडी होतील, त्याकडे लक्ष ठेवले जाते आहे. हे वृत्त लिहीत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार गटाच्या संभाव्य ‘एनडीए’ प्रवेशास विरोध केला असल्याची स्थिती कायम आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘एनडीए’मध्ये सामील होण्याबद्दल भारतीय जनता पक्षाने मला फोन केला नाही किंवा आम्हीही त्यांच्याशी संपर्क केला नाही, असे विधान केले असले तरी प्रत्यक्षात दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांचाच आता ‘एनडीए’त जावे, असा आग्रह आहे.
विश्वासात घेऊनच पावले टाकणार : भाजपची भूमिका
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दै. ‘पुढारी’शी बोलताना आम्हाला सहयोग देणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाची ओळख तशीच राहावी आणि त्यांना विश्वासात घेऊनच पावले टाकावीत, अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या घडामोडींमध्ये समन्वयाची भूमिका स्वीकारली जाईल, असे आश्वासन सुनेत्रा पवार आणि पार्थ यांना देण्यात आले आहे. या विषयावर आताच फार काही बोलणे उचित नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सांगितले जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील नेत्यांशी यासंदर्भात संपर्क साधायचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.