मुंबई : विधानसभा निवडणुकांतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाने आता मुंबई महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. पालिका निवडणुका लक्षात घेत आगामी मुंबई भाजप अध्यक्षपदी पुन्हा एकदा मराठी नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांच्या राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाचा शोध सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आव्हान लक्षात घेत पुन्हा एकदा मराठी नेत्याकडेच हे पद दिले जाणार असल्याचे कळते.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भातील न्यायालयीन खटल्यावर नव्या वर्षात जानेवारी महिन्याअखेरीस निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विशेषतः पक्षात संघटनात्मक बदलांची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय तसेच प्रदेश पातळीवर अध्यक्ष बदल होणार आहेत. मुंबई अध्यक्ष पदीही नव्या चेहरा येण्याची शक्यता आहे. नवा अध्यक्ष नियुक्त करताना पालिका निवडणुकांचा फॅक्टर लक्षात घेतला जाणार आहे. मुंबईतील ठाकरे गटाचे आव्हान लक्षात घेत यावेळीही मराठी नेत्याकडेच अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आमदार अमित साटम, पराग आळवणी, अतुल भातखळकर आदींची नावे चर्चेत आहेत. मात्र, प्रदेश नेतृत्वाशी असलेली जवळीक लक्षात घेता अमित साटम यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद दिले जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मुंबई महापालिका राजकारणाचा अनुभव ही या पदासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये केवळ दोन जागांचे अंतर होते. यंदा हे अंतर कापत शिवसेना ठाकरे गटाकडून महापालिका काबीज करण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे. पश्चिम उपनगर तसेच पूर्व उपनगरातील काही भागांत भाजपची स्थिती चांगली आहे. मात्र, मध्य मुंबईत पक्षाला विशेष मेहनत करावी लागणार आहे.