मुंबई : एकमेकांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडायचे नाहीत, असा निर्णय झाल्यानंतरही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा डोंबिवलीत शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी फोडल्याने महायुतीत फोडाफोडीला फोडणी मिळाली आहे.
भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी पक्षाकडून नाराजी व्यक्त करीत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. तसेच शिवसेनेचे दुसरे मंत्री दादा भुसे यांनी ही बाब वरिष्ठ स्तरावर निदर्शनास आणून दिली जाईल, असे सांगितले.
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांना भिडले
भाजप-शिवसेनेत निर्माण झालेला तणाव निवळत असताना आता पुन्हा दोन्ही पक्षांत फोडाफोडीवरून वाद निर्माण झाला आहे.
डोंबिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख विकास देसले यांना रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश दिला. यावर मंत्री शिरसाट म्हणाले, फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू. तुम्ही एक फोडाल तर आम्ही एकाच्या बदल्यात चार फोडू.
दरम्यान, मंत्री भुसे यांनी एकमेकांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडायचे नाहीत, असा निर्णय झाला असताना डोंबिवलीत भाजपने आमचे पदाधिकारी कसे फोडले, याबद्दल संबंधितांना विचारणा करण्यात येईल, असे सांगितले. तसेच स्थानिक आमदार राजेश मोरे यांनीही या फोडाफोडीवर संताप व्यक्त केला.