मुंबई : गौरीशंकर घाळे
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आपल्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. पक्षाकडून अद्याप उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, शुक्रवारी रात्रीपासूनच नावे नक्की झालेल्या उमेदवारांना पक्ष नेतृत्वाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचनांचे फोन जात आहेत. ६४ उमेदवारांना एबी फॉर्म देत अर्ज भरण्याची सूचना करणारे फोन गेल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
भाजप आणि शिंदे गटात सध्या जागावाटपासाठी चर्चा सुरू आहेत. मुंबईतील २२७ जागांपैकी २०७जागांवरील वाटप अंतिम झाले आहे. तर, २० जागांवरील तिढा कायम असून त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. २०७ जागांपैकी १२८ जागा भाजपला, तर ७९ जागा शिंदे गटाला मिळणार आहेत. उर्वरित वीस भागांतील जास्तीतजास्त जागा आपल्याकडे खेचण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः शिंदे गटाने ९५ जागांचा आग्रह धरल्याने वीसपैकी १५ जागा मिळविण्याचा आग्रह धरला आहे, तर भाजपकडून जिंकून येण्याची क्षमतेचा निकष पुढे केला जात आहे. या वीस जागांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतर अंतिम निर्णय केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, रविवारी रात्री आणखी आठ जागांवर दोन्ही पक्षात सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजपच्या वाट्याला आलेल्या जागांवरील पक्षाकडून उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आल्याची माहिती पक्षातील सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरूवारीच उमेदवारांच्या यादीवर मान्यतेची मोहोर उठविण्यात आल्याचे समजते. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपासूनच संबंधित उमेदवारांना निरोपाचे फोन केले जात आहेत. सोमवार आणि मंगळवारी असे दोनच दिवस आता अर्ज दाखल करण्यास शिल्लक आहेत. त्यामुळे आवश्यक सर्व कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज, सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात विजयाची खात्री असलेल्या ए-प्लस गटातील या ६४ जागा असल्याचे समजते. सोमवारी उर्वरित जागांवरील उमेदवारांनाही अर्ज दाखल करण्यासाठीचे निरोप भाजपकडून दिले जातील, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
कोअर कमिटीची बैठक
रविवारी रात्री भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष अमीत साटम, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला.