मुंबई : आगामी काळात सहकार आघाडीच्या मार्फत आणि प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली असे काम उभे करू की, मुंबई महापालिकेवर जेव्हा महायुतीचा भगवा फडकेल तो भगवा फडकण्यामागे सहकार आघाडीचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी येथे व्यक्त केला.
भाजपा सहकार आघाडी मुंबईतर्फे भाजप मुंबईच्या दादर येथील कार्यालयात आयोजित ‘मुंबईतील सहकार’ या विषयावर ते बोलत होते. मुंबईची अर्थव्यवस्था सहकाराच्या ताब्यात असावी, अशी भूमिका भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडली.
या कार्यक्रमाला मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, कंझ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले, सहकार आघाडीचे अध्यक्ष सुनील बांबूळकर, मुंबई सहकार आघाडीचे अध्यक्ष अनिल गजरे, सुभाष मराठे, जिजाबा पवार यांसह सहकार आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणाले, सहकारामुळे आपल्या सर्वांची मुंबईकरांशी नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांसाठी जशी महापालिका आहे, तशी मुंबई भाजपासाठी सहकार आघाडी आहे. त्यामुळे येथे बसलेले कार्यकर्ते, पदाधिकारी मुंबई महापालिका निवडणुकीत विजयाकरिता सिंहाचा वाटा उचलू शकतात. प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागून स्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रश्न सोडवून घेतले. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून आपण मुंबई शहरात क्रांती घडवली.
मुंबईत 1960,70,80 च्या दशकात इमारती उभारल्या, त्यावेळी विकासक नव्हते. त्यावेळी स्वयंपुनर्विकासच होता. 1990 च्या दशकात मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासक जन्माला आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीत राहणार्या मराठी माणसाला 180 चौ. फुटांतून 500 चौ. फुटांचे घर दिले. अभ्युदय नगरच्या लोकांना 630 चौ.फुटांचे घर देण्याचे काम ते आता करत आहेत, तर दुसर्या बाजूला प्रवीण दरेकर मुंबई शहरात राहणार्या मराठी माणसाला स्वयंपुनर्विकासाच्या मार्फत स्वतःचे मोठे घर त्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.
ही खरी मराठी माणसाची सेवा आहे. त्यामुळे फक्त मराठी माणसाकरिता गप्पा करणे किंवा मराठी माणसाच्या बाता मारणे इथपर्यंत आमचे मराठी माणसाबाबतचे प्रेम सीमित नाही. कोविडच्या काळात सर्वांनी पाहिले, ज्यांनी प्रत्यक्ष काम करायला पाहिजे होते ते फेसबुक लाईव्ह करत बसले आणि या महाराष्ट्रातील जनतेचे अश्रू पुसण्याचे काम त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले, असा टोला अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
साटम पुढे म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत मराठी माणसासाठीचे काम मुंबई शहरात भाजपच्या माध्यमातूनच झाले. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून एवढी ताकद मुंबईत उभी केली, त्यासोबत भाजपाची ताकद वाढविण्यामागे दरेकर यांचा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सिंहाचा वाटा आहे. मुंबईत मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम अनेक संस्था, सहकार क्षेत्राच्या मार्फत करत आहोत. आपण जी क्रांती घडवून आणली ती येणार्या काळात मुंबईकरांच्या समोर ठेवणे महत्त्वाचे आहे. जे स्वयंपुनर्विकासाचे 22 प्रकल्प यशस्वी उभे केले, त्या 22 प्रकल्पांकडे बघून पुढे हजारो हाऊसिंग सोसायट्या कर्ज मागण्यासाठी आपल्या दारात उभ्या असतील, असा विश्वासही साटम यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी आ. दरेकर आपल्या भाषणात म्हणाले, मुंबईतील सहकार चळवळीला मी एवढी ताकद देत असेन, मुख्यमंत्री फडणवीस आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहत असतील तर तुम्हीही एकत्रितपणे नवनियुक्त मुंबई अध्यक्षांना त्यांचे मुंबईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावावा या भावनेतून ही बैठक बोलावली आहे. आपण अनेक योजना आणतोय. लाडक्या बहिणींना एक लाखाचे बिनव्याजी कर्ज दिले. 25 हजार महिलांना मुंबईत छोट्या छोट्या व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज द्यायचे आहे, हे आपले उद्दिष्ट आहे.
सुदैवाने 106 वर्षांची परंपरा असलेल्या व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मला मिळाली. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सहकारावर अवलंबून आहे. माझे सहकारातील कार्यकर्त्यांना नेहमी सांगणे असते की , मुंबईची अर्थव्यवस्था ही सहकाराच्या ताब्यात असली पाहिजे. 15 हजार कोटींच्या बँकेचा अध्यक्ष प्रवीण दरेकर होऊ शकतो हे केवळ सहकाराच्या ताकदीवर. ही सर्व ताकद एकत्रित करायची असून या ताकदीला दिशा द्यायची असल्याचेही दरेकर म्हणाले.
सहकारी कार्यकर्त्यांचा मेळावा षण्मुखानंदमध्ये घेऊ
ज्या सहकाराच्या जीवावर राष्ट्रवादी व इतर पक्षाचे नेते मोठे झाले; परंतु त्यांचे सहकाराकडे लक्ष नाही. मी जेव्हा जेव्हा सांगतो, त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आपल्यामागे पहाडासारखे उभे राहतात. सहकाराला मुख्यमंत्री फडणवीसांचे संरक्षण आहे. त्यांचे मुंबईच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हीही त्याच ताकदीने खारीचा वाटा मुंबईच्या योगदानात दिला पाहिजे. येणार्या काळात षण्मुखानंद भरेल एवढ्या सहकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ, असा विश्वासही दरेकरांनी उपस्थितांना दिला.