पुढारी ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी आज (दि. ४)एकमताने निवड झाली आहे. आता गुरुवार, ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत.
विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांनी निवड करण्यात आली. पक्षाचे केंद्रीय निरिक्षक निर्मला सितारमन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उईके मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संभाजी पाटील-निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप गोडसे, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. गट नेता पदासाठी केवळ फडणवीस यांच्या नावाचाच प्रस्ताव आला. अन्य कोणत्याच नावाचा प्रस्ताव नसल्याचे सांगतानाच विजय रूपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात येत असल्याची घोषणा केली.
विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे आज (दि. ४) सकाळी १० वाजता भाजप आमदारांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत भाजप गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून यांनी भाजपचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता.
महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा बहुमत मिळाल्याने सरकार स्थापन करणार आहे. महायुतीने 230 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 132, शिवसेना (एकनाथ शिंदे) 57 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) 41 जागा जिंकल्या आहेत.