Municipal Election News : आधी चर्चा आता स्वबळाची चाचपणी, भाजपचं 'मिशन महापालिका', अमित शहांनी काय सूचना दिल्यात?  File Photo
मुंबई

Municipal Election News : आधी चर्चा आता स्वबळाची चाचपणी, भाजपचं 'मिशन महापालिका', अमित शहांनी काय सूचना दिल्यात?

शिंदे-पवारांसोबतच्या चर्चेनंतर अमित शहा यांच्या भाजप नेत्यांना सूचना

पुढारी वृत्तसेवा

BJP likely to face Thane and Pune municipal elections on its own, along with Mumbai

मुंबई : गौरीशंकर घाळे

मुंबईसह ठाणे आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकांना भाजप स्वबळावर सामोरे जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुण्यात अधिक जागांचा आग्रह कायम ठेवल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील भाजप नेत्यांना त्यादृष्टीने तयारीला लागण्याच्या सूचना मुंबई भेटीत दिल्या.

राज्यात चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे साधरणपणे पावसाळ्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार सत्ताधारी आणि विरोधी गोटातील पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अमित शहा हे तीन दिवस महाराष्ट्राच्या दौय़ावर होते. नागपूर, नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून सोमवारी रात्री मुंबईत दाखल झालेल्या अमित शहा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. सोमवारी रात्री उशीरा अमित शहा आणि अजित पवारांची भेट झाली. या भेटीत अजित पवारांकडून पुण्यात अधिकच्या जागांचा आग्रह धरण्यात आला.

तर, मुंबईत राष्ट्रवादीचे विशेष स्थान नसल्याने इथल्या जागांबाबत आग्रही भूमिका मांडली गेली नाही. पुण्याबाबत मात्र राष्ट्रवादीने अधिक जागांचा आग्रह धरला. त्यानंतर, मंगळवारी सकाळी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. शिंदे यांनी मुंबईत तुल्यबळ जागा मागितल्या.

मुंबईतील जागावाटपात शिवसेनेला किमान १०७जागा मिळाव्यात, अशी आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याचे समजते. गेल्या तीन वर्षात ठाकरे गटाला धक्का देत मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला आहे. २०१२ आणि २०१७ च्या पालिका निवडणुकीत विजयी झालेले शंभरहून अधिक माजी नगरसेवक सध्या आपल्या पक्षात आहेत. पालिका निवडणुकीत संधी मिळेल, या शब्दावर हे माजी नगरसेवक ठाकरे घटातून इकडे आले आहेत. त्यांना निराश करता येणार नाही, शब्द पाळावा लागेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडल्याचे समजते.

मात्र, २२७ पैकी १०७ जागा तुम्हाला सोडल्यास भाजपच्या वाट्याला केवळ १२० जागा उरतात. त्यातही पुन्हा आरपीआयसह अन्य छोटे मित्रपक्ष किंवा सोबत आल्यास राष्ट्रवादीलाही जागा सोडाव्या लागण्याची शक्यता अमित शाह यांनी बोलून दाखविल्याचे समजते. त्यातच भाजपने मागील निवडणुकीत स्वबळावर ८२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे महायुतीने एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्यास जागावाटपाचा तिढा वाढण्याचीच शक्यता अधिक असल्याने भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबतच्या चर्चेनंतर स्वतः अमित शहा यांनी राज्यातील भाजप नेतृत्वाला तशा सूचना दिल्याचे माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई, ठाणे आणि पुणे यांसह अन्य काही महत्वाच्या शहरात महायुतीतील तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जावे. तर, उर्वरित ठिकाणी स्थानिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा, असा कौल अमित शहा यांनी मुंबईतील राजकीय भेटीनंतर दिल्याची माहिती आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढवाव्या लागणार असल्याचे विधान केले होते. आता अमित शहा यांनीही त्यादृष्टीने चाचपणीचे निर्देश प्रदेश भाजपला दिले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीही एकसंध राहणार नसल्याने किमान महत्वाच्या शहरांत तरी स्वबळाच्या चाचपणीचे भाजपचे धोरण ठरल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT