मुंबई : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत गेले चार दिवस उपोषण सुरू असून, जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी शब्दांत टीका करत आहेत. मात्र, भाजपचे मराठा नेते हे जरांगे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेले दिसत नाहीत. जरांगे यांना अंगावर कोण घेणार, असा उलट सवाल भाजपचे मराठा नेते करत आहेत.
जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस यांना लक्ष्य केले जात असल्याचे स्वतः फडणवीस बोलले आहेत. गेले चार दिवस जरांगे उपोषणाला बसले आहेत; पण मराठा आरक्षणासाठी त्यांचे फडणवीस यांनाच सवाल आहेत. फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते तेव्हाही जरांगे यांचा टीकेचा रोख फडणवीस यांच्यावरच होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जरांगे शांत होते. देशाची आर्थिक राजधानी वेठीस धरली आहे. भाजपचे नेते हे खासगीत जरांगे यांना अंगावर कोण घेणार, असे बोलत आहेत.
जरांगे यांच्याविरोधात गेलो तर मराठ्यांची मते विरोधात जातील, अशी भीती या मराठा नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे पडद्यामागून भाजपच्या अनेक नेत्यांचे जरांगे यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे फडणवीस विरुद्ध जरांगे या लढाईत कोणीही पडायला तयार नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री या विषयावर काही बोलण्यास तयार नाहीत. मराठवाड्यातील भाजपच्या नेत्यांनी तर कानावर हात ठेवले आहेत.
मी चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्याचा संदर्भ काही नेते देत आहेत. फडणवीस अडचणीत आलेले महायुतीतील काही नेत्यांना हवे आहे. त्यामुळे जरांगे यांना प्रत्युत्तर देण्यास कोणास रस दिसत नाही.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत जरांगे यांची समजूत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढली होती, असा दावा केला जात आहे. त्यामुळे विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय समिती नेमली आहे. विखे-पाटील यांचे नेतृत्व आक्रमक नाही. गेले चार दिवस चर्चा सुरू आहे; पण अजून कोणताही तोडगा निघालेला नाही.