मुंबई

‘सकाळच्या भोंग्याला विचारा, आता कसं वाटतंय?’, हरियाणाच्या निकालानंतर फडणवीसांचा राऊतांना टोला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘हरियाणातील निकालाबाबत आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासूनच स्क्रिप्ट लिहून बसले होते. सकाळी 9 वाजता बोलणारा भोंगा रात्रीपासून स्क्रिप्ट तयार करुन बसला होता. काय काय बोलू आणि काय नाही असं त्यांना वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आहे आता कसं वाटतंय?’ असा टोल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला आहे. हरियाणाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ‘जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेल्या लोकांना आता जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज हरियाणात जे घडलं ते येत्या नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला फेक नॅरेटिव्हने हरवलं होतं. ज्यादिवशी हे लक्षात आलं त्यादिवशी आपण महाराष्ट्रासह देशभरात या फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याचं ठरवलं. पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती.’

पहिली सलामी हरियणाची दुसरी महाराष्ट्राची

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिली सलामी हरियाणाने दिली आहे. यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे. हा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे. हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा आहे. मी केवळ हरियणाचं बोलणार नाही तर जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तिथे भारत आणि लोकशाही जिंकली आहे. कारण जे लोक म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील त्यांनी येऊन बघावं की आम्ही काश्मीरमध्ये निवडणूक घेऊन दाखवली. कुठलीही भीती किंवा तत्सम वातावरण कुठेही नव्हतं. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका आपण घेऊन दाखवल्या. आंतराराष्ट्रीय जगतात पाकिस्तान जे सांगत होता की सेनेच्या माध्यमातून कब्जा केला आहे. त्या पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण घेऊन दाखवली. जगाने मान्य केलं की 370 कलम हटवणं योग्य होतं. जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे. असेही ठामपणे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT