मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेसने केलेल्या ठिय्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजपने देशभर आंदोलन केले. मुंबईत टिळक भवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चामध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सहभाग होता.
टिळक भवनासमोर या मोर्चाने आंदोलन केले. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी अमित साटम यांनी केला. राहुल गांधी यांनी आपले संपलेले राजकारण या निमित्ताने जिवंत करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी परदेशात देशाच्या शत्रूंना केव्हा आणि कुठे भेट दिली याचा तपशील जाहीर करावा असे आव्हान साटम यांनी दिले.
भारत आर्थिक महासत्ता बनत असल्याने देशाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून कट रचला जात असल्याचा आरोपही साटम यांनी केला. या निदर्शनावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.