मुंबई : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत भाजपची जणू त्सुनामी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आदी 29 पैकी 19 महापालिकांमध्ये निर्विवाद विजय मिळवला असून भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरला आहे. यापैकी 14 महापालिकांमध्ये भाजपला एकट्याला बहुमत मिळाल्याने भाजपचा हा ऐतिहासिक विजय ठरला आहे. या 14 ठिकाणी भाजपची एकहाती सत्ता येणार असून उर्वरित 9 ठिकाणी महायुतीचे महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उर्वरित 6 महापालिकांपैकी काँग्रेसने लातूर, चंद्रपूर आणि भिवंडी येथे विजय मिळविला आहे. भाजपची सत्ता असलेली चंद्रपूर महापालिका यावेळी भाजपने गमावली आहे. या तिन्ही महापालिकेत काँग्रेसचे महापौर बनतील. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडी तर मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीने 84 पैकी 35 जागा जिंकून विजय मिळविला आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एमआयएम या पक्षाने महाराष्ट्रात 95 ठिकाणी मुसंडी मारली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाच्या या त्सुनामीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार तडाखा दिला आहे. सोबतच मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का बसला आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकीत चांगली कामगिरी करणार्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ठाणे, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर वगळता अन्य महापालिकांमध्ये पीछेहाट झाली असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर वगळता अन्य ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अस्तित्व लातूरमधून पुसून टाकण्याविषयी केलेले वक्तव्य काँग्रेसच्या पथ्यावर पडले. लातूर महापालिकेत भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. तिथे काँग्रेसची स्वबळावर सत्ता आली आहे. चंद्रपूर महापालिकेतही काँग्रेसला उबाठा शिवसेनेच्या मदतीने सत्तेची संधी आहे. तर कोल्हापूर आणि भिवंडी - निजामपूर महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उबाठा शिवसेनेची या निवडणुकीतही मोठी पीछेहाट झाली आहे. उबाठाला एकमेव परभणी महापालिकेत काँग्रेसच्या मदतीने सत्ता मिळविण्याची संधी आहे. अन्य सर्व महापालिकांमध्ये उबाठाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि मनसेची या निवडणुकीतही वाताहत झाल्याने या पक्षांचे अस्तित्व आणखी क्षीण झाले आहे; तर अनपेक्षितपणे राज्यात एमआयएमचा अनेक महापालिकांत प्रभाव वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मुस्लिम मतदार एमआयएमकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून 29 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. गुरुवारी या महापालिकांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात शहरी मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपल्या मतांचे भरभरून दान टाकल्याने भाजपची राज्यभर त्सुनामी आली आहे. 29 महापालिकांपैकी तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. या त्सुनामीमध्ये महाविकास आघाडीला तर तडाखा दिलाच; पण मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मागे ढकलले आहे. मुंबईसह नवी मुंबई, पनवेल, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, इचलकरंजी, सांगली - मिरज - कुपवाड, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर, अमरावती, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या महापालिकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, पनवेल, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, सोलापूर, सांगली - मिरज - कुपवाड, इचलकरंजी, नांदेड या 14 महापालिकांमध्ये भाजपने स्वबळावर विजयपताका फडकवली आहे.
ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला राखला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही त्यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र भाजपही तेथे बरोबरीत असल्याने महापौरपदासाठी चुरस लागणार आहे. उल्हासनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेने बरोबरी केल्याने तेथेही कोणाचा महापौर होणार याची उत्सुकता आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आदी ठिकाणी मात्र मित्रपक्ष भाजपने धक्का दिला आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवत पवार काका-पुतण्यांना धक्का दिला. अजित पवार यांची राष्ट्रवादी केवळ अहिल्यानगर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र तेथे त्यांना सत्ता स्थापनेसाठी भाजप किंवा शिवसेनेची मदत घ्यावी लागणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने वसई - विरार महापालिका जिंकत कमबॅक केले आहे. उबाठा शिवसेनेला या निवडणुकीत सर्वत्र पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची तर पुरती वाताहत झाली असून त्यांना सत्ता मिळविणे तर दूरच; पण आपले फारसे नगरसेवकही निवडून आणता आलेले नाहीत.