Police Raid Pudhari
मुंबई

ED Raid: ईडीचे मुंबई, वडोदरा येथे छापे; १२ कोटी २० लाखांचे दागिने, ४३ लाख रोकड जप्त

सात निवासी आणि व्यावसायिक ठिकाणी तसेच तीन बँक लॉकरवर नुकतीच ही कारवाई करण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बिलपॉवर लिमिटेडशी संबंधित १६० कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि वडोदरा येथे छापे टाकले. सात निवासी आणि व्यावसायिक ठिकाणी तसेच तीन बँक लॉकरवर नुकतीच ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ईडीने १२ कोटी २० लाख रुपयांचे दागिने आणि ४३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली. दोन बँक खात्यांमधील सुमारे २७ लाख रुपये गोठविण्यात आले असून तीन बँक लॉकरही गोठवले आहेत.

याप्रकरणी एसबीआयच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने कंपनी, संचालक व संबंधित संस्थांविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर ईडीने मनी लाँडरिंगच्या दृष्टीने तपास सुरू केला. तपासात काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कर्जाची रक्कम वळविल्याचा ईडीला संशय आहे.

छाप्यांमध्ये मालमत्तेची कागदपत्रे, हिशेबाची पुस्तके, लेजर आणि डिजिटल उपकरणेही मिळाली आहेत. या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि जप्त केलेले दागिने व रोकड कर्जाच्या गैरव्यवहारातील पैशांशी संबंधित आहेत का, याचा सखोल तपास सध्या ईडीकडून सुरू आहे.

१६० कोटींचे नुकसान

बिलपॉवर लिमिटेडने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून विविध प्रकारची कर्जे घेतली होती. कंपनीने कर्जाची रक्कम इतर कंपन्यांकडे वळवून हिशेबात फेरफार केल्याने बँकेचे १६० कोटी ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. कंपनीच्या कर्ज खात्याचे २०१२ मध्ये बुडीत कर्जात रूपांतर झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT