Biker seriously injured in BEST bus accident in Majas
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
अंधेरी आगरकर चौक येथून महाकाली गुंफा येथे जाणाऱ्या बेस्ट बसच्या मागील बाजूला मोटरसायकल स्वाराने जोरदार धडक दिली. यावेळी हा युवक मागच्या चाकाखाली आल्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून एमआयडीसी पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत.
अंधेरी आगरकर चौक येथून महाकाली गुंफाकडे जाणारी बेस्ट उपक्रमाची खासगी बस क्रमांक ३३३ सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास मजास डेपो, मातेश्वरी, नेल्को सिग्नल येथे आली. यावेळी मोहम्मद अली रोड येथील रहिवासी इस्माईल सुरतवाला या (३५ वर्षीय) युवकाने बसच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. यावेळी बसचा मागचा टायर युवकाच्या डाव्या हातावरून गेला.
या अपघातात युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने अंधेरीच्या होली स्पिरिट हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असून, त्याचा हात वाचवण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच बेस्टचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सध्या अपघातग्रस्त बस एमआयडीसी पोलीस ठाण्यात उभी आहे. या अपघाताची चौकशी सुरू आहे.