मुंबई : दसर्याच्या आधी 30 सप्टेंबरला मेट्रो 3 भुयारी मार्गिकेच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरीही हे लोकार्पण पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
या मेट्रो मार्गिकेला आधी कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. सध्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या उर्वरित मार्गिकेवर सीएमआरएसच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र सीएमआरएसच्या मुख्य आयुक्तांनी अद्याप या मार्गिकेला भेट दिलेली नाही. लोकार्पणाच्या तारखेला 5 दिवस शिल्लक राहिलेले असतानाही या भेटीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल व त्याच दिवशी भुयारी मेट्रोचे लोकार्पण होईल, अशी शक्यता होती. मात्र, पंतप्रधानांच्या कार्यालयातून एमएमआरसीएलशी काहीही संपर्क साधण्यात आलेला नाही.
नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण आता 30 सप्टेंबर ऐवजी 30 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी किंवा त्याआधी मेट्रोचे लोकार्पण केले जाईल.