भिवंडी (मुंबई): शांतीनगर परिसरात एकाच ठिकाणी काम करणारे व एकाच ठिकाणी राहणाऱ्या तिघा भावांनी जुन्या वादातून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिशान अन्सारी (२५) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिशान व त्याच परिसरात राहणारे हसन मेहबुब शेख, (वय २२), मकबुल मेहबुब शेख, (वय ३०), हुसेन मेहबुब शेख, (२८) हे तिघे भाऊ गोदामात एकाच ठिकाणी हमाली काम करण्यासाठी जात होते. त्यातून क्षुल्लक वाद झाल्याचा राग मनात ठेवून हसन मेहबुब शेख, मकबुल मेहबुब शेख, हुसैन मेहबुब शेख व दोन महिला यांनी जिशान याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत हाताच्या ठोश्याबुक्यानी, लाथांनी मारहाण केली. या प्रकराची कल्पना जिशान याला कुणीतरी दिली. तो तातडीने घरी आला. जिशान दुचाकीवरून घरी आला असता, दुचाकीवरून उतरत असताना त्यास हसन याने लाथ मारून खाली पाडले. जिशानला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये जिशान याचा मृत्यू झाला.
गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणत मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून हसन शेख, मकबुल शेख, हुसैन शेख व दोन महिला अशा पाचजणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.