मुंबई : संततधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे अन्य तलाव ओसंडून वाहत असून आता भातसा व अप्पर आणि तलावही काठोकाठ भरले आहेत. सातही तलावांतील पाणीसाठा 97.23 टक्केंवर पोहचला आहे.
शहराला दररोज सर्वाधिक 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणार्या भातसा तलावातील पाणीसाठा 96.14 टक्के झाला आहे. त्यामुळे 100 टक्के तलाव भरण्यासाठी आता अवघ्या 40 हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.
पालघर व ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाणी साठ्यांत झपाट्याने वाढ झाली. आतापर्यंत भातसा व अपर वैतरणा तलाव वगळता अन्य तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. सात तलावमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. 8 सप्टेंबरपर्यंत तलावामध्ये 14 लाख 7 हजार 218 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे.
भातसा तलावही आठवडाभरापूर्वी ओसंडून वाहू लागला होता. परंतु धरणावर येणारा पाण्याचा दाब लक्षात घेऊन, या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावही भरत आला असून हा तलाव भरण्यासाठी अवघ्या 5 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे.
अप्पर वैतरणात कमी साठा
अप्पर वैतरणा तलावात 2 लाख 22 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान 2024 च्या तुलनेत यंदा 7 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा कमी आहे.
पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा 2,22,225 (97.88 %)
मोडक सागर 1,28,925 (100 %)
तानसा 1,43,181 (100 %)
मध्य वैतरणा 1,87,816 (97.05 %)
भातसा 6,89,327 (96.14 %)
विहार 27,698 (100 %)
तुळशी 8,046 (100 %)