भांडुपची दरडप्रवण क्षेत्रे दुर्लक्षित  pudhari photo
मुंबई

Bhandup landslide zones : भांडुपची दरडप्रवण क्षेत्रे दुर्लक्षित

नाडर चाळ, पाटकर कंपाऊंडमधील रहिवासी सतत धास्तावलेले

पुढारी वृत्तसेवा
मुंबई : शेखर भोसले

भांडुप (पश्चिम) भागातील पाटकर कंपाऊंडमधील नाडर चाळ ही टेकडीच्या पायथ्याशी व उतारावर वसलेली दाट वस्ती. पावसाळ्यात येथे भूस्खलनाचा धोका असून यापूर्वीही येथे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी कायम दरडींच्या छायेखाली वावरत असतात. त्यामुळे या संवेदनशील दरडप्रवण क्षेत्राकडे प्रशासनाने लक्ष घालून समस्या कायमची सुटावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

येथे माती व खडकांची रचना काही ठिकाणी कमकुवत असल्यामुळे दरडींचा धोका आहे. येथे प्रामुख्याने चाळवजा झोपडपट्टी असून दाट लोकवस्ती आणि अनियोजित पद्धतीने, अनधिकृत पणे बांधलेली काही पत्रांची घरे आहेत. मुसळधार पावसामुळे मातीची धूप होते आणि पाणी जमिनीत मुरल्याने तिचा भार वाढतो. त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता येथे अधिक आहे.

नाडर चाळ, पाटकर कंपाऊंड, भांडुप (पश्चिम) येथील परिस्थिती पाहता, बृहन्मुंबई महानगरपालिकेला (इचउ) आणि स्थानिक प्रशासनाला यावर कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्थानिक रहिवाशांनीही प्रशासनाशी सहकार्य करून सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

दरड कोसळल्याने रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, शौषालय यांसारख्या मूलभूत सुविधा विस्कळीत होण्याची भीती आहे. सततच्या या भीतीमुळे आणि प्रत्यक्ष घटनांमुळे लोकांवर मानसिक आघात झाला असून सततचे दडपण आणि भीतीची छाया त्यांच्यावर असल्याचे रहिवासी सांगतात.

महापालिकेकडून उपाययोजना

रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. पालिका आणि एनडीआरएफ यांनी येथील धोकादायक अवस्थेतील घरमालकांना त्यांची घरे रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. जागृतीसाठी माहितीपूर्ण बॅनर आणि फ्लेक्स लावले आहेत. महानगर पालिका शाळेत तात्पुरत्या निवार्‍याची सोय उपलब्ध करून दिली आहे. भूस्खलनाच्या वेळी काय करावे याबद्दल प्रशिक्षण दिले जात आहे. असे असताना स्थलांतर केले नाही आणि दुर्घटना घडली तर अपघाताची किंवा जीवितहानीची जबाबदारी प्रशासनाची राहणार नाही, असे एस प्रभागाच्या पालिका अधिकार्‍यांनी येथील रहिवाशांना सांगितले आहे.

जेथे सुरक्षा उपाययोजना प्रभावी ठरू शकत नाही, अशा ठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचे योग्य पुनर्वसन प्रशासनाने करावे, अशी मागणी सातत्याने येथील नागरिक करत आहेत. परंतु प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करून तात्पुरत्या उपाययोजना करण्यात धन्यता मानत आहे.
परम जयस्वाल, स्थानिक रहिवासी
दरडीच्या धोक्यांबद्दल आणि आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याबद्दल स्थानिक लोकांना माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्यास नागरिकांना वेळेवर माहिती देणारी यंत्रणा (उदा. सायरन, एसएमएस अलर्ट) कार्यान्वित केले पाहिजे.
पुरुषोत्तम वारे, सामाजिक कार्यकर्ते

उपाययोजना काय ? 

  • संरक्षक भिंती आणि जाळ्या : धोकादायक डोंगरउतारांवर काँक्रीटच्या मजबूत संरक्षक भिंती (रिटेनिंग वॉल) बांधणे आणि दगडांना खाली येण्यापासून रोखण्यासाठी जाडसर लोखंडी जाळ्या (रॉकफॉल नेटिंग) बसवण्याची नागरिकांची मागणी आहे.

  • वृक्षारोपण : डोंगरउतारांवर मोठ्या प्रमाणावर योग्य प्रजातींची झाडे लावण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे झाडांची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात, मातीची धूप कमी होते आणि भूस्खलनाचा धोका कमी होतो.

  • पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था : पावसाचे पाणी डोंगरउतारावरून व्यवस्थित खाली जाईल आणि जमिनीत मुरणार नाही, याची खात्री करण्यासाठी योग्य गटारे आणि ड्रेनेज सिस्टीमची निर्मिती करण्याची जरुरी आहे. यामुळे मातीचा भार वाढणार नाही.

  • भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि अभ्यास : वेळोवेळी भूवैज्ञानिक तज्ज्ञांकडून परिसराचे सर्वेक्षण करून भूभागाच्या स्थिरतेचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणे निश्चित करून त्यानुसार उपाययोजना आखली पाहीजेत.

  • असुरक्षित बांधकामे हटवणे : डोंगरउतारावर किंवा अगदी पायथ्याशी असलेल्या धोकादायक, अनधिकृत आणि कच्च्या बांधकामांना हटवून तेथे कोणत्याही नवीन बांधकामांना परवानगी दिली जाऊ नये.

  • आपत्कालीन पथके : दरड कोसळल्यास त्वरित मदतकार्यासाठी प्रशिक्षित आपत्कालीन पथके प्रशासनाने सज्ज ठेवली पाहीजेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT