मुंबई : नवरात्री उत्सवनिमित्त महालक्ष्मी यात्रा सुरू झाली असून भक्तांसाठी बेस्टने विशेष बस सेवा दिली आहे. सोमवार 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा मुंबईतील विविध भागासह भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्थानक येथून महालक्ष्मी मंदिर दरम्यान सुरू ठेवण्यात येणार आहे. दररोज 25 जादा बस चालवण्यात येणार आहेत.
नवरात्रीत मुंबईसह आजूबाजूच्या शहरांतून मोठ्या प्रमाणात भक्त महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येतात. महालक्ष्मी, भायखळा, दादर, आदी रेल्वे स्टेशनवर उतरून अनेक भक्त महालक्ष्मी मंदिरापर्यंत बेस्टने प्रवास करतात. त्यामुळे मंदिरात जाणार्या भक्तांची गैरसोय होऊ नये व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या जादा बस धावणार असून 1 ऑक्टोबरपर्यंत त्या सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले. यात्रेसाठी येणार्या भक्तांना मार्गदर्शन व्हावे यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकार्यांची नियुक्ती केली आहे.
दररोज 25 जादा बस चालवण्यात येणार असून प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरता गर्दीच्यावेळी लालबाग, चिंचपोकळी, सातरस्ता व महालक्ष्मी रेल्वेस्थानक मार्गे नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसांच्या कालावधीत विशेष बससेवा मोठ्या प्रमाणात चालविण्यात येणार असल्याचेही बेस्टकडून सांगण्यात आले.