मुंबई: बेस्ट आगार आणि विविध आस्थापनांमधील सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी बेस्ट उपक्रम सुरक्षा कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. यासाठी सैनिकी मंडळाने १८१ सेवानिवृत्त सैनिकांची यादी बेस्टला दिली आहे. महिन्याभरात ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तसेच पात्र उमेदवारांची संख्या वाढवण्यासाठी भरतीची कमाल वयोमर्यादा ४० वरून ४५ वर्षे करण्याचा प्रस्ताव बेस्टने ठेवला आहे.
सैनिकी मंडळाने दिलेल्या १८१ सेवानिवृत्त सैनिकांच्या यादीमध्ये बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ सैनिक आहेत. ५ जूनपासून या पात्र उमेदवारांना बेस्टकडून पत्रे पाठविली जाणार आहेत. बेस्टच्या २७ आगारांसाठी ५८२ सुरक्षा रक्षकांची भरती आवश्यक आहे. अनेक डेपोंना चोरी, अतिक्रमण आणि जमिनीवर अवैध कब्जा यांसारख्या सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी शिवाजी नगर डेपोमधून जवळपास १० इलेक्ट्रिक बस चार्जिंग गन चोरीला गेल्यानंतर सुरक्षेची चिंता अधिक वाढली. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक डेपोचे दरवाजे बंद ठेवावे लागत आहेत किंवा त्यांच्यावर अपुरी देखरेख ठेवली जात आहे. यामुळे काही परिसर अतिक्रमण आणि अनधिकृत कारवायांसाठी असुरक्षित बनले असल्याचे बेस्ट समिती सदस्य रमाकांत गुप्ता यांनी सांगितले.