BEST Redevelopment Dues Pudhari
मुंबई

BEST Redevelopment Dues: थकबाकीदार विकासकांना बेस्टची पुनर्वसनाची कामे! विकासकांनी बेस्टचे ३२७० कोटी थकवले

विकासकांची थकबाकी असलेले अनेक पुनर्विकास प्रकल्प आता पूर्णत्वास गेले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट आगार व स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे काम हाती घेतलेल्या तीन मोठ्या विकासकांनी बेस्टचे जवळपास ३ हजार २७० कोटी रूपये थकवले आहेत. एवढी मोठी थकबाकी असताना नव्याने प्रस्तावित २३ पुनर्विकासकाची कामे या विकासकांना देण्याचा घाट प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप 'आपली बेस्ट आपल्यासाठी' या संघटनेकडून करण्यात आला आहे.

विकासकांची थकबाकी असलेले अनेक पुनर्विकास प्रकल्प आता पूर्णत्वास गेले आहेत. विकासकांनी त्यातून मोठा व्यावसायिक नफा कमावला आहे. मात्र, करारानुसार ठरलेले विकास हक्क शुल्क अद्याप पूर्णपणे जमा केलेले नाही.

त्यामुळे 'बेस्ट'ला आर्थिक फटका बसला आहे. एवढी थकबाकी असताना ही रक्कम तातडीने वसूल केल्याशिवाय नव्याने प्रस्तावित असलेले २३ आगार आणि बस स्थानकांच्या पुनर्विकासाला प्रशासनाने मंजुरी देऊ नये, अशी मागणी 'आपली बेस्ट आपल्यासाठी' संघटनेचे अध्यक्ष रूपेश शेलटकर यांनी बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्याकडे केली आहे.

बेस्ट हा केवळ सार्वजनिक वाहतूक उपक्रम नसून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विकासकांकडून ३,२७०.०९ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यापैकी २,७९० कोटी रुपये ही मूळ देय रक्कम असून उर्वरित रक्कम व्याज, विलंब दंड आणि इतर अधिभाराची आहे.

यामध्ये २,१६८ कोटी रुपये कणकिया समूह, ४५५ कोटी वाधवा समूह, ३८६ कोटी के एस एल अँड इंडस्ट्रीज असे ३,२७०.०९ कोटी थकबाकी आहे. हे पैसे आल्यास बेस्ट सुमारे ६०० स्वमालकीच्या बस खरेदी करू शकते.

त्यामुळे भाडेतत्त्वावरील बेस्टचे अवलंबित्व कमी होऊ शकते. तेव्हा कराराची कठोर अंमलबजावणी करावी. न्यायालय किंवा इतर कायदेशीर मार्गाने मूळ रक्कम, व्याज आणि दंडाची प्रभावी वसुली करावी, अशी मागणी ही शेलटकर यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT