मुंबई: मुंबईच्या राजकीय आणि कामगार वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'दी बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'च्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. या अटीतटीच्या लढतीत, 'दी बेस्ट वर्कर्स युनियन' पुरस्कृत शशांक राव यांच्या पॅनलने २१ पैकी १४ जागांवर दणदणीत विजय मिळवत क्रेडिट सोसायटी आपल्या ताब्यात घेतली आहे.
भाजपासह दोन्ही शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी संचालक पदाच्या निवडणुकीत प्रथमच एकत्रित निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे बंधूंना बेस्ट कर्मचाऱ्यांनी नाकारले आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्र येऊन लढवलेल्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा मिळवता आलेली नाही. हा निकाल ठाकरे बंधूंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर सत्तेचे स्वप्न बघणाऱ्या भाजपा पॅनलच्या अवघ्या चार जागा निवडून आल्या. शिवसेना शिंदे गटाने ही आपले खाते उघडले असून त्यांच्या दोन जागा निवडून आले आहेत.
बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये मजबूत पकड असलेल्या 'दी बेस्ट वर्कर्स युनियन'ने या निवडणुकीत पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. शशांक राव यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात त्यांनी बहुमताचा आकडा सहज पार करत १४ जागांवर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे पुढील काही वर्षांसाठी सोसायटीचा कारभार राव गटाच्या हाती राहणार हे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे. दोन्ही पक्षांनी मिळून 'उत्कर्ष पॅनल'च्या माध्यमातून ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ठाकरे बंधूंच्या या राजकीय ऐक्याला सपशेल नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही, ही दोन्ही पक्षांसाठी आत्मचिंतन करायला लावणारी बाब आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या 'सहकार समृद्धी पॅनल'ने ७ जागा जिंकून मुख्य विरोधी गट म्हणून स्थान मिळवले आहे.
बेस्ट कर्मचारी क्रेडिट सोसायटीची निवडणूक केवळ एका आर्थिक संस्थेपुरती मर्यादित नसून, ती मुंबईतील कामगार संघटना आणि राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. या निकालामुळे बेस्टच्या कामगार वर्तुळातील राजकीय समीकरणे येत्या काळात बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, शशांक राव यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे.
शशांक राव पॅनल (दी बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत): १४ जागा (विजयी)
सहकार समृद्धी पॅनल (प्रसाद लाड पुरस्कृत): ७ जागा (विजयी)
उत्कर्ष पॅनल (ठाकरे बंधू पुरस्कृत): ० जागा
उगवता सूर्य-सहकार विकास पॅनल: ० जागा