मुंबई : बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालाने बेस्ट खासगीकरणाचा डाव उधळला गेला, असा दावा बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केला. या निकालावर बाजूने आणि विरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शशांक राव म्हणाले, सध्याच्या बेस्टच्या वाईट परिस्थितीला शिवसेना आणि बेस्ट कामगार सेना जबाबदार आहे. उद्धव ठाकरे गट गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट समितीत आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी बेस्टचे नुकसान केले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी लढा देत असल्याचेही निकालने दाखवून दिले.
ठाकरेंनी नुकसान केले
सध्या बेस्टची जी वाईट स्थिती आहे, त्याला शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्याकडे महापालिका होती. ते मुख्यमंत्री होते. तरीही त्यांनी कामगार हिताचे निर्णय घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आल्याचे ते म्हणाले. उद्धव सेना ही गेल्या अनेक वर्षांपासून या समितीत आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी बेस्टचे नुकसान केले. 9 वर्षांनी ही निवडणूक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी न्याय लढा देत आहोत. त्याला आलेले हे यश आहे, असे राव म्हणाले.
या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र येणे हा काही मुद्दा नव्हता. कामगारांसाठी जो लढा देईल, त्यांच्या हक्कासाठी लढेल, मग तो एकटा असला तरी त्याला निवडून दिले जाते, हे आज या निकालाने दाखवून दिले आहे. कोणी कितीही एकत्र आले आणि त्यांनी कामगारांसाठी जर काम केले नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार,असा टोला शशांक राव यांनी लगावला.
पैशांचा प्रचंड ओघ - गेल्या आठवडाभरापासून निवडणुकीत पैशांचा प्रचंड ओघ पाहायला मिळत होता. आम्हाला वाटले की कर्मचारी पैसे स्वीकारतील, पण मतदान आम्हालाच करतील, मात्र पैशाच्या ताकदीपुढे आमची प्रामाणिक मते कमी पडली.सुहास सामंत, कामगार नेते, शिवसेना ठाकरे गट
पराभव झालेल्यांनी पैशांचा वापर झाल्याचा आरोप करणे चुकीचे - ज्यांचा पराभव झाला त्यांनी पैशांचा वापर झाला, असा आरोप करणे चुकीचे आहे. युद्ध अजून संपलेले नाही. कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. शशांक राव व प्रसाद लाड यांचे अभिनंदन.संदीप देशपांडे, मनसे नेते
25 वर्षांच्या अन्यायाला चोख उत्तर - 25 वर्षांपासून या संस्थेचे सतत शोषण करून तिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे काम ठाकरे ब्रँडशी निगडित लोकांनी केले. परंतु यावेळी बेस्ट कामगार, मुंबईतील जनता आणि कामगार बांधवांनी त्यांना धडा शिकवत पतपेढीच्या हिताचे रक्षण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ठाकरे ब्रँडचा पुरा धुव्वा उडाला असून, त्यांना एकही जागा मिळाली नाही. हाच कामगारांचा खरा विजय आहे.आमदार प्रसाद लाड, भाजप
मनसेच्या हाती भोपळा - भाजप पक्ष म्हणून आम्ही या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक कामगारांची होती. याचे राजकीयकरण उबाठा आणि मनसेने केले. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचे फळ त्यांना मिळाले आणि हाती भोपळा आला.डॉ. आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री