BEST Bus Strike Mumbai Pudhari
मुंबई

BEST Bus Strike Mumbai: बेस्ट संप सुरूच; २५ लाख प्रवाशांचे हाल

शनिवारी बसने जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बारा संघटनांनी स्थापन केलेल्या 'बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती'ने शुक्रवारपासून पुकारलेला बेमुदत संप शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. बेस्टच्या स्वतःच्या आणि कंत्राटी अशा २ हजार ७८८ बसेसपैकी फक्त ४ बस धावल्या. ५ हजार चालकांपैकी ५ बेस्टचे आणि २७ कंत्राटी असे फक्त ३२ चालक शनिवारी कामावर होते. परिणामी बेस्टच्या २५ लाख प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

शनिवारी बसने जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. रस्त्यावर एकही बस नसल्याने प्रवाशांना आपले बेत बदलण्याची वेळ आली. त्याचा फायदा रिक्षा, टॅक्सीवाल्यांनी उठवला.

बस नाही म्हणून प्रवाशांनी रिक्षा-टॅक्सी स्टॅण्डकडे धाव घेतली. दादर मार्केट, दादर पूर्व स्वामी नारायण मंदिर, सायन, वडाळा स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी रिक्षा-टॅक्सींसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र चालकांनी दुप्पट-तिप्पट भाडे आकारत प्रवाशांची अक्षरशः लूट केली. दादर परेल भागात टॅक्सी मिळत नसल्याने केईएम, टाटा कॅन्सर, वाडिया रुग्णालयासाठी जाणाऱ्या रुग्णांचे हाल झाले.

बेस्ट संप सुरू झाल्यापासून वडाळा, कुर्ला, धारावी, मागाठाणे, कुलाबा, गोरेगाव,ओशिवरा, मरोळ अशा मोठ्या आगारांमधील बेस्ट कार्यालयांना दोन दिवसांपासून टाळे आहे. येथील कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

फक्त ४ गाड्या धावल्या

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बेस्टच्या स्वतःच्या २४६ आणि कंत्राटी वेटलीजच्या २५२१ अशा एकूण २,७६६ बसेस असताना शनिवारी संध्याकाळी ४ पर्यंत फक्त कंत्राटी ४ बसेस कार्यरत होत्या. बेस्टचे स्वतःचे २५७२ चालक आहेत. शिवाय कंत्राटी ५७०८ चालक आहेत. त्यापैकी फक्त २७ बेस्टचे आणि ५ कंत्राटी चालक कामावर रुजू होते. शिवाय ३८५३ आणि १७३३ कंत्राटी अशा ५ हजार ५८६ कंडक्टरपैकी फक्त १० कंडक्टर कार्यरत होते.

शुक्रवारी या संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चर्चा केली होती. या बैठकीला नगरविकास सचिव आसिम कुमार गुप्ता, बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होत्या.

मात्र, या बैठकीत ज्या ज्या चर्चा झाल्या त्यांना बगल देण्याचे काम प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप समितीचे संयोजक ॲड. उदयकुमार आंबोणकर यांनी केला.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी मिळून यामध्ये मार्ग काढावा. तुम्ही म्हणाल तेथे, सांगाल तेव्हा आम्ही चर्चेसाठी येऊ, असे ॲड. आंबोणकर म्हणाले.

आज नीट परीक्षा आणि संप

रविवारी 'नीट'ची परीक्षा आहेे. विद्यार्थ्यांना त्रास नको म्हणून तातडीने बैठक घेऊन संपावर तोडगा काढण्याची विनंती संयुक्त कृती समितीने केली असली तरी शासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही. नीटला जाणार्‍या विद्यार्थ्यांची आधी बेस्टचा संप परीक्षा घेईल असे दिसते. मात्र मुंबईतील ६३ परीक्षा केंद्रांवर वाहतूक सेवा देण्यासाठी ६० अतिरिक्त बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. या बसेस सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत धावणार आहेत.

'मेस्मा' नोटिसा

बेस्ट कामगारांच्या संपाला 'मेस्मा' लागू केला असून शनिवारी संपाच्य दुसर्‍या दिवशी २१ कामगारांना अटक करण्यात आली. तरीही कामगारांनी कडकडीत संप पाळला. आणखी काही कामगारांना 'मेस्मा' अंतर्गत नोटिसा काढण्यात आल्या असून रविवारी ही कारवाई तीव्र होण्याचे संकेत आहेत.

मी नेहमी सायन रुग्णालयात कामावर जाण्यासाठी वांद्रे कलानगर येथून थेट बसने जाते. मात्र बेस्ट संपामुळे मला दोन दिवस घरातून रिक्षाने वांद्रे स्थानक आणि पुढे दादर, सायन असा मोठा प्रवास करणे भाग पडत आहे. बेस्ट बस नसल्यामुळे मला दोन दिवस उशिरा कामावर जाणे भाग पडले आहे.
- माधुरी शिर्के - वांद्रे
माझ्या वडिलांची केईएम रुग्णालयात तपासणी सुरू आहे. मी त्यांना बेस्ट बस क्रमांक ४० किंवा ४४० बसने गोरेगाव येथून घेऊन जातो. मात्र गेले दोन दिवस माझे खूप हाल होत आहेत. माझ्या वडिलांना धारावीपर्यंत रिक्षा आणि पुढे टॅक्सीने घेऊन जाताना खूप त्रास होत आहे.
- पवन गुप्ता - गोरेगाव
आम्हाला बेस्ट संप करून मुंबईकरांना त्रास देण्याचा कोणताही हेतू नाही. तुमच्यासारखेच आमचे कुटुंबसुद्धा बेस्टचे प्रवासी आहेत. मात्र सरकार आणि प्रशासन आमच्या कोणत्याच मागण्यांकडे लक्ष देत नाही. शिवाय काही घटना घडल्यास आम्हीच दोषी दिसतो. त्यामुळे अखेर नाइलाजास्तव आम्ही संपाचे हत्यार उपसले आहे.
-कृष्णा घाडगे, बेस्ट चालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT